आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीचा निकाल जाहीर:औरंगाबाद अव्वल, बीड दुसरे, जालना तिसऱ्या क्रमांकावर, औरंगाबाद विभागाचा निकाल 4.37 टक्क्यांनी घसरला, निकालात विभागात पुन्हा मुलींचीच बाजी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालात विभागीय शिक्षण मंडळामधून औरंगाबाद जिल्ह्याने बाजी मारली आहे. जिल्ह्याचा निकाल ९६.४८ टक्के लागला. बीड जिल्हा दुसऱ्या तर जालना जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला. हिंगोली आणि परभणी हे जिल्हे पिछाडीवर राहिले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी मागील इयत्तेच्या मूल्यांकनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने प्रत्यक्ष परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. होम सेंटर विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आले होते. असे असले तरी परीक्षा कॉपीमुक्त होतील अशी आशा होती. त्यामुळे निकाल घसरणार अशी अपेक्षा होती. मात्र निकाल या अपेक्षेच्या उलट लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल ९४.९७ टक्के लागला. गतवर्षीपेक्षा औरंगाबाद विभागाचा निकाल ४.३७ टक्क्यांनी घसरला असल्याची माहिती औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाचे प्रभारी अध्यक्ष अनिल साबळे यांनी दिली. औरंगाबाद विभागातून १ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यापैकी १ लाख ५६ हजार ०१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालातही मुलींनी बाजी मारली असून त्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.७५ टक्के आहे.

औरंगाबाद विभागाचा बारावीचा निकाल ९४.९७ टक्के
जिल्हानिहाय टक्केवारी अशी

औरंगाबाद ९६.४८%
बीड ९५.०९%
परभणी ९३.२५%
जालना ९३.९८%
हिंगोली ९३.५२%
एकूण ९४.९७%

असा आहे विभागाचा शाखानिहाय निकाल
विज्ञान ९७.९४%
वाणिज्य ९४.३९%
कला ९१.४०%
एचएससी व्होकेशनल ९१.३४%
टेक्निकल सायन्स ५३.४४%
एकूण निकाल ९४.९७%

पुरवणी परीक्षेसाठी प्रक्रिया १० जूनपासून
विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी अनुत्तीर्ण आणि श्रेणी सुधारसाठी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया १० ते १७ जून नियमित शुल्कासह असणार आहे, तर बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्याची मुदत १८ ते २१ जून असणार आहे. याद्या जमा करण्याची मुदत २२ जून असेल, अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

बीड: मराठवाड्यात यंदा बीड जिल्हा दुसरा
यंदा बारावीचा निकाल ९५.०९ टक्के लागला असून बीड जिल्हा मराठवाड्यात दुसरा आला आहे. शहरी भागातून १४ हजार ३१० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यापैकी ९६९ मुले अनुत्तीर्ण झाले. तर ग्रामीण भागातून ८६९ विद्यार्थी नापास झाले.

परभणी : यंदा बारावीचा निकाल ९३.२५ टक्के
परभणी जिल्ह्यातील २४ हजार ४७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. यातील एकूण २४ हजार १८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. यापैकी २२ हजार ३९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे हे प्रमाण ९३.२५ टक्के आहे.

लातूर: निकाल ९६.२१ टक्के; मुलींचीच बाजी
लातूर | लातूर जिल्ह्यात इयत्ता बारावीमध्ये ३४,८४२ विद्यार्थ्यांपैकी ३३,५२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९६.२१ टक्के लागला. जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलीस सरस ठरल्या असून मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९७.२२ टक्के, तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.४६ टक्के एवढी आहे. लातूर जिल्ह्यातून बारावी परीक्षेसाठी ३४,८४२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३३,५२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

जालना: ९३.९८ टक्के, जाफराबाद अव्वल
यंदा डिस्टींग्शन मधील विद्यार्थी संख्या वाढली असून एकूण ३१ हजार ४१९ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ९७३ विद्यार्थी अाले. तर जिल्ह्याचा यंदाचा निकाल ९३.९८ टक्के आहे. जाफराबाद तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९६.६१ टक्के लागले.

हिंगोली: बारावी परीक्षेत मुलींनीच मारली बाजी
हिंगोली जिल्ह्याचा इयत्ता बारावीचा निकाल ९३.५३ टक्के लागला असून या वर्षीही मुलींनीच बाजी मारली आहे. बारावी परीक्षेत मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.८१ टक्के तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९२.५९ टक्के एवढी आहे.

लातूर विभागाचा निकाल ९५.२६ टक्के
लातूर| लातूर विभागामध्ये इयत्ता बारावीचा निकाल ९५.२६ टक्के लागला असून विभागातून सर्वात जास्त ९६.२२ टक्के निकाल लातूर जिल्ह्याचा लागला आहे. लातूर विभागातही मुलींनीच बाजी मारली आहे.

लातूर विभागात लातूर, नांदेड व उस्मानाबाद जिल्हे येतात. यामध्ये विभागातून ८८५३७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ८४३६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९५.२६ टक्के लागला आहे. यामध्ये १८१२० विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले असून ४१३७५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २३१६१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर १७०६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दरम्यान, लातूर विभागात नांदेड जिल्ह्यातील ३७८२९ पैकी ३५९०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९४.९० टक्के लागला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील १६०३४ पैकी १५०६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९३.९८ टक्के लागला आहे, तर लातूर जिल्ह्यातून ३४९६७ पैकी ३३६४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९६.२२ टक्के लागला आहे.

लातूर विभागात विज्ञान शाखेतील ४१२२९ विद्यार्थ्यांपैकी ४०५२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ९८.३० टक्के लागला आहे. कला शाखेतून ३३४४५ पैकी ३०७३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ९१.८९ टक्के, तर किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमात ३९०९ पैकी ३५८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ९१.६० टक्के लागला आहे. लातूर विभागात ४९९०५ मुलांपैकी ४७०१६ मुले उत्तीर्ण झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...