आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:पैसे घेऊन लस देणारे ते दोन आरोग्य सेवक निलंबित, साजापुर लसीकरण काळाबाजार प्रकरण

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही आरोग्य सेवकांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

औरंगाबाद जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोनाची लस चोरून, प्रत्येकी ३०० रुपये घेऊन लसीकरण करणाऱ्या गणेश दुरोळे, सय्यद अमजद सय्यद अहेमद या दोन्ही आरोग्य सेवकांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

तासंतास रांगेत उभे राहूनही लस मिळत नाही. असे असतांना लोकांकडून ३०० रुपये घेऊन कोरोनाची लस दिली जात असल्याच्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी साजापूर येथील एका घरात छापा टाकून दुरोळे यास रंगेहाथ पकडले होते. त्याच्या ताब्यातून कोविड-१९ व्हॅक्सीनची बॉटल (वॉयल), रिकामी बॉटल (वॉयल), नवीन व वापरलेली इंजेक्शन, रोख रक्कम आदी साहित्य जप्त केले होते. कोविड-१९ ची वॉयल्स रांजणगाव उपकेंद्राचे प्रभारी सुपरवायझर सय्यद अमजद यांच्याकडून घेतल्याचे दुरोळे याने पोलिसांना सांगितले. त्यावरून पोलिसांना दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. हे दोघे लोकांकडून पैसे घेऊन त्यांना लस देत होते. व त्यानंतर त्यांची नावे ऑनलाइन कोविन ॲपवर नोंदवत होते. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून शिस्तीस धरून नाही. त्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) १९६७ मधील तरतुदीचा भंग केल्याचे प्रथम दर्शनी सिध्द होते. त्यामुळे या दोघांना सेवेतून तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी काढले आहेत. निलंबन कालावधीतील त्यांचे मुख्यालय सोयगाव तालुक्यातील सावळदबारा प्राथमिक आरोग्य केंद्र हे राहील. या आदेशाची नोंद संबंधिताच्या मूळ सेवा पुस्तिकेत घेण्याचेही निर्देश डॉ. गोंदावले यांनी दिले आहेत.

या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला असल्याने, पोलिसांच्या चौकशीत इतर सर्व बाबी समोर येतील. प्रशासनाच्यावतीने या दोघांची विभागीय चौकशी लावण्यात येईल. पोलिसांचे चार्जशीट आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येईल. त्यानंतर त्यांची चौकशी होईल, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांनी सांगितले. यासंदर्भात प्रकरणातील दोघांच्या निलंबनाचे आदेश सीईओंनी दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...