आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबजाज फायनान्सचे काम करणाऱ्या 6 ते 7 रिकव्हरी एजंटांनी बुधवारी गुंडगिरी करत दोन भावांना बेदम मारहाण केली. मोबाइलचा केवळ एक हप्ता थकला म्हणून या रिकव्हरी एजंटांनी कॅनॉट प्लेस परिसरात दोघा भावांना स्क्रू ड्रायव्हर, बेल्टने बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
आईचा फोटो व्हायरल केला
धक्कादायक म्हणजे वसुलीसाठी एजंटांनी तरुणाच्या आईचा फोटोही व्हायरल केला. घटनेला 24 तास उलटून गेले असूनही आरोपींना अजून अटक झालेली नाही. याबाबत सिडको पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले की, या प्रकरणी 7 आरोपींवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपींना अजून अटक होऊ शकलेली नाही. पोलिस आरोपींच्या शोधात आहेत.
नेमकी घटना काय?
क्रेडिट कार्डचे काम करणारा अनिकेत नंदकिशोर शहाणे (वय 25, रा. कैलासनगर) याने दोन महिन्यांपूर्वी कॅनॉट प्लेस येथील एसएसडी दुकानातून प्रशांत नावाच्या तरुणाकडून बजाज फायनान्सवर मोबाइल घेतला होता. परंतु त्याचा एक हप्ता थकला म्हणून 'अनिकेतच्या आईला आपण ओळखता का?' असे लिहून हे फोटो प्रशांतने व्हायरल केले.
स्क्रू ड्रायव्हर, बेल्टने मारहाण
आईचे फोटो व्हायरल केल्याचे अनिकेतला समजताच त्याने मोबाइल दुकानात संपर्क केला. तेव्हा 'लगेच हप्ता भर' असे म्हणत आरोपी प्रशांतने शिवीगाळ सुरू केली. तेव्हा अनिकेतसोबत 20 वर्षांचा भाऊ अभिषेकदेखील होता. दोघेही दुकानात गेले तेव्हा प्रशांत व त्याच्या सहा साथीदारांनी स्क्रू ड्रायव्हर, बेल्टने बेदम मारहाण केली.
मारहाणीने डोक्यात 7 टाके
अनिकेतच्या डोक्यात सात टाके पडले. त्यानंतर टवाळखोरांनी त्याचा दुसरा मोबाइल काढून पोबारा केला. पोलिसांनी प्रशांत नामक कर्मचाऱ्यासह अन्य सात साथीदारांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.
कर्मचाऱ्याला केले निलंबित
बजाज फायनान्सने यासंदर्भात अधिकृतरित्या स्पष्टीकरण दिले आहे. त्यात ते म्हणतात की, औरंगाबादमध्ये ग्राहकासोबत गैरवर्तन करण्यात आल्याच्या वृत्तासंदर्भात आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, तृतीय पक्षातील व्यक्तीच्या अशा प्रकारच्या कोणत्याही वर्तनाचा बजाज फायनान्स लिमिटेड ठामपणे निषेध करते. कंपनीसाठी ग्राहक अत्यंत सन्माननीय आणि महत्त्वाचे आहेत. ग्राहकांना सेवा देताना तृतीय पक्ष एजन्सीतर्फे कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन झाल्यास ते सहन केले जाणार नाही. एजन्सीसोबत या प्रसंगातील सत्यतेची पडताळणी केल्यानंतर, एजन्सीने संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ग्राहकांना सेवा देताना कर्मचारी तसेच कंपनीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तृतीय पक्ष अशा दोहोंसाठी बजाज फायनान्स लिमिटेडतर्फे कठोर नियमांचे पालन केले जाते. काही चुकीचे वा अघटित, वा नियमाला धरून न चालल्यास व काही अनियमित घडल्यास कंपनीच्या नियम आणि धोरणांनुसार योग्य कारवाई केली जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.