आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद विद्यापीठ क्रीडा महोत्सव:ऑलिम्पिकपटू धनराज पिल्ले, सुमन आर यांची उपस्थिती राहणार

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 3 ते 7 डिसेंबरदरम्यान होणाऱ्या राज्य क्रीडा महोत्सवात 3500 खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या उद्घाटन सोहळ्यास ऑलिम्पिकपटू धनराज पिल्ले व तिरंदाज सुमन आर. यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास 2.70 कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी क्रीडा महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण कुलगुरू डॉ.प्रमोद येवले व प्र-कुलगुरू डॉ.श्याम शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले. कुलगुरू म्हणाले की, या महोत्सवात अ‍ॅथलेटिक्स, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी व खो-खो या पाच खेळांचा समावेश असून 22 विद्यापीठांचे महिला-पुरुष संघ सहभागी होणार आहेत. कबड्डी स्पर्धा मॅटवर तर खो-खाे स्पर्धा मातीच्या मैदानावर होणार आहे. स्पर्धा साखळी व बाद पद्धतीने खेळवली जाईल. 27 नोव्हेंबर रोजी प्रवेशाची अंतिम तारीख आहे. क्रीडा महोत्सवाच्या यशस्वितेसाठी राज्यपाल नियुक्त निरीक्षक समिती तसेच विविध 30 समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यात स्वागत, निवास, भोजन, वित्त, खेळनिहाय मैदान, पात्रता तपासणी, खेळांच्या तांत्रिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. स्पर्धेचे उद्घाटन 3 डिसेंबरला सायंकाळी 4 वाजता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड, राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, पद्मश्री धनराज पिल्ले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याचबरोबर अॅथलेटिक्स मैदानावरील सिंथेटिक ट्रकच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमदेखील पार पडणार आहे. स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन, ऑलिम्पियन सुमन आर. उपस्थित राहतील. या वेळी कुलसचिव डॉ.भगवान साखळे, क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ.कल्पना झरीकर, संयोजन समिती सदस्य डॉ.फुलचंद सलामपुरे, संजय शिंदे, डॉ.संदीप जगताप, गणेश कड आदींची उपस्थिती होती.

प्रथमच खेळाडूंची ऑनलाइन नोंदणी

विद्यापीठाच्या क्रीडा इतिहासात प्रथमच खेळाडूंची संपूर्ण नोंदणी ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या युनिक टीमने नवीन सॉफ्टवेअर बनवले आहे. पारदर्शकतेमुळे बोगस खेळाडू खेळण्यावर आळा बसेल. मैदानावर सर्व खेळ एकच ठिकाणी दिसतील अशी सोय करण्यात आली असून त्यासाठी मोठ्या एलएडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. वैद्यकीय, पाणी, विश्रामाची खेळाडूंसाठी विशेष सोय करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...