आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक प्रकार:रस्ताच नसल्याने ग्रामस्थांनी 3 किमी चिखल​​​​​​​ तुडवत​​​​​​​​​​​​​​ रुग्णाला खाटावरुन नेले रुग्णालयात; कन्नडमधील दुर्दैवी प्रकार

संतोष निकम | औराळा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
रस्ता नसल्याने रुग्णाला खाटेवर उपचारासाठी नेताना तिसवड वस्तीवरील ग्रामस्थ. छाया -संतोष निकम, औराळा.

भारताला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षे झाली मात्र आजही कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी ते जवळी या रस्त्यावर ५०० लोकवस्ती असलेल्या तिवसड वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांसाठी येण्याजाण्यासाठी रस्ताच नसल्याने आजारी रुग्णांना खाटेवर टाकून रुग्णालयात घेऊन जाण्याचा दुर्दैवी प्रकार सोमवारी पाहायला मिळाला.

तिसवड वस्तीवरील कडुबा भाऊसाहेब आहेर यांची सोमवारी अचानक तब्येत खालवल्याने त्यांना दवाखान्यात काय करावे हा प्रश्न नातेवाईकांना पडला. बैलगाडी सुद्धा ज्या रस्त्यावर चालत नाही तेथे बाकीचे वाहन येणे शक्य नसल्याने शिवना टाकळीचे उपसरपंच सुदाम शिवाजी आहेर, ज्ञानेश्वर आहेर, श्रीकांत वाकळे,अमोल बारगळ, अक्षय कुदाळे, सचिन बारगळ यांनी तिन किलोमीटर कडुबा आहेर यांना खाडेवर( बाजेवर) टाकून तीन किलोमीटर गुढघ्याइतका चिखल तुडवत मोठ्या कसरतीने चांगल्या रस्त्यापर्यंत आणले आणि तेथून त्या रुग्णाला दवाखान्यात पोहोचवले.

गेल्या कित्येक वर्षांपासून पावसाळ्यात या तिसवड वस्तीवरील गरोदर माता व दुर्धर आजार असणाऱ्या रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी होत असलेले हाल याला तालुक्यातील राजकारणी व प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. शिवना टाकळीपासून केवळ तीन किमीअंतर असताना ही राजकारण्यांच्या अनास्थेमुळे नागरिकांची अनेक वर्षांपासून रस्त्याअभावी परवड होत आहे. रोजच्या दळणवळणासाठी सुद्धा साधा रस्ता नाही. त्यामुळे आजारी व्यक्ती, गरोदर माता आणि दुर्धर आजार असणाऱ्या गावातील व्यक्तींना दवाखान्यात जाण्यासाठी खाटेवर किंवा कावड करून न्यावे लागत आहे. तर रस्त्यामुळे वेळेवर दवाखान्यात उपचार न मिळाल्यामुळे अनेक गरोदर माता रस्त्यात प्रसुती झाल्या. पावसाळ्यात सर्व शेती पेरलेली असतात. त्यामुळे दळणवळणासाठी खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. कारण या वस्तीवरुन शिवना टाकळी कडे व जवळी गावाकडे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे गुढघ्याइतका चिखल तुडवत, झाडा झुडपातून रस्ता काढत शिवना टाकळी जावं लागतं. अनेकवेळा ग्रामस्थांकडून रस्त्यासाठी प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन झाले मात्र ह्या बाबीकडे कोणीही गांभीऱ्याने लक्ष घालत नाही. आमदार उदयसिंह राजपूत यांनी तालुक्याच्या विकासासाठी लाखो हजारो रुपयांचा निधी खेचून आणला मात्र या तीन किमी रस्त्यावर साधे मुरुम टाकला जात नसल्याचे सरपंच सुदाम आहेर यांनी दिव्य मराठीशी बोलताना यांनी सांगितले.

जर येथील ग्रामस्थांना मूलभूत सुविधापासून वंचित ठेवले असतील तर हे लोक नेमकं भारतातच राहतात का हा प्रश्न पडला असल्याचे नागरिकांनी सांगितले. येणाऱ्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापर्यंत जर या रस्त्यावर काही मुरुम, किंवा दबाईचे काम सुुरू केले नाही झाले तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी ग्रामस्थांच्या वतीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ईमेलद्वारे निवेदन पाठवण्यात येईल त्यामुळे प्रशासनाने या वस्तीच्या रस्त्याच्या समस्येकडे लक्ष देऊन परवड थांबवावी, अशी मागणी सरपंच सुदाम आहेर, ज्ञानेश्वर आहेर, अक्षय कुदळे, अमोल बारगळ, सचिन बारगळ, श्रीकांत वाकळे, राहुल औताडे, संकेत आहेर, ज्ञानेश्वर वाकळे, भगवान वाकळे, रोहिदास वाकळे, सुदाम आहेर, बाळासाहेब बारगळ यांच्यासह ग्रामस्थांनी केलीय.

बातम्या आणखी आहेत...