आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जालना रोडवर साइड ड्रेन, विमानतळासमोर भुयारी मार्ग; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत आहे रस्त्याचे काम, 72 कोटी रुपयांचा खर्च

औरंगाबाद9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरात प्रथमच साइड ड्रेनची सुविधा

प्रत्येक पावसाळ्यात जालना रोडवर हायकोर्टासमोर पाणी साचून राहते. आता लवकरच हा प्रश्न सुटेल. नगर नाका ते केंब्रिज चौकापर्यंत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकारणाने ७२ कोटी रुपये खर्चाची विविध कामे हाती घेतली आहेत. त्यात या रस्त्यावर साइड ड्रेन केले जात असून पाण्याचा निचरा होण्यासाठी हे ड्रेन कामी येतील. मार्च २०२२ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांसाठी निधी देण्याची घोषणा केली होती. त्यात जालना रोड आणि सिडको ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशनमार्गे बीड बायपास असे दोन प्रमुख रस्ते होते. मात्र, हे रस्ते बनवण्यापूर्वी मनपाने भूसंपादन करून देणे गरजेचे होते. परंतु, भूसंपादन करण्यासाठी पुन्हा निधीची अडचण सांगितल्यामुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केवळ जालना रोड आहे तेवढ्याच रुंदीमध्ये डांबरीकरण, ओव्हर-ले, साइड ड्रेन आणि एक भुयारी मार्ग करून देण्याचे काम सुरू केले. या प्रकल्पासाठी ७२ कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे.

येथे होईल डांबरीकरण
दोन वर्षांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने बाबा पेट्रोल पंप ते चिकलठाणा विमानतळापर्यंत डांबरीकरण केले होते. त्यामुळे एवढा भाग वगळून म्हणजे बाबा पेट्रोल पंप ते नगर नाका (१६०० मीटर) आणि विमानतळ ते केंब्रिज चौकापर्यंत (साडेचार किलोमीटर) डांबरीकरण केले जात आहे. हे डांबरीकरण म्हणजे केवळ डांबराचा एक थर (ओव्हर-ले) दिला आहे. हे काम पूर्ण झाले आहे.

२०२२ पर्यंत पूर्ण होणार काम
केंब्रिज चौक ते नगर नाक्यापर्यंत १४ किलोमीटर लांबी, त्यापैकी बाबा पेट्रोल पंप ते नगर नाका (१६०० मीटर) आणि विमानतळ ते केंब्रिज चौकापर्यंत (साडेचार किलोमीटर) डांबरीकरण आणि विमानतळ ते बाबा पेट्रोल पंपापर्यंत केवळ साइड ड्रेन आणि पेव्हर ब्लॉकचे काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होईल.

सर्व कामांसाठी एकच निविदा
विमानतळासमोर भुयारी मार्ग बांधला जाणार आहे. यामुळे जालना रोडवरून सरळ धावणारी वाहने विनाअडथळा जातील. तर विमानतळाकडे जाणारी किंवा येणारी वाहनेही विनाअडथळा मुख्य रस्त्यावर येऊ शकतील. भुयारी मार्ग, साइड ड्रेन आणि ओव्हर-ले या सर्व कामांसाठी एकच निविदा प्रक्रिया झालेली असून मार्च २०२२ पर्यंत काम पूर्ण करण्यासाठी मुदत आहे.

शहरात प्रथमच साइड ड्रेनची सुविधा
केंब्रिज चौक ते नगर नाका या १४ किलोमीटर अंतरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा साइड ड्रेन तयार केले जात आहेत. आजवर शहरात कुठल्याच मुख्य रस्त्याला साइड ड्रेन नव्हता. अगदी बीड बायपाससारख्या राष्ट्रीय महामार्गावरदेखील साइड ड्रेन अस्तित्वात नाही. पावसाळ्यात पाण्याचा ताबडतोब निचरा होण्यासाठी साइड ड्रेन महत्त्वाचा मानला जातो.

बातम्या आणखी आहेत...