आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:लसीकरण तपासणीची कुठे प्रामाणिकपणे अंमलबजावणी, तर कुठे नुसताच दिखावा

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबा पेट्राेल पंपावर लसीचे प्रमाणपत्र असणाऱ्यांनाच आधी टाेकन देऊन नंतरच इंधन दिले जात हाेते. - Divya Marathi
बाबा पेट्राेल पंपावर लसीचे प्रमाणपत्र असणाऱ्यांनाच आधी टाेकन देऊन नंतरच इंधन दिले जात हाेते.

काेराेना प्रतिबंधक लसीचे प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय २५ नोव्हेंबरपासून पेट्रोल, डिझेल, दारू देऊ नका. मॉलमध्येही प्रवेशापासून रोखा, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले होते. त्याची गुरुवारी काही ठिकाणी प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली. प्रमाणपत्र दाखवल्यावरच इंधन मिळत होते. मॉलमध्ये प्रवेश दिला जात होता. तर काही ठिकाणी मात्र अंमलबजावणीचा नुसताच दिखावा हाेता. दरम्यान, या आदेशामुळे आता मनपाच्या आरोग्य केंद्रात डोस घेण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे.

लसीकरणात औरंगाबाद जिल्हा राज्यात २६ व्या क्रमांकावर कशामुळे? अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली होती, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत ३० नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा, असे आदेश दिले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी नो व्हॅक्सिन नो रेशन, पेट्रोल असे सांगितले. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बाबा पेट्रोल पंपाला कुलूपही लावले होते. या कारवाईला विरोध होऊनही ते ठाम राहिले. २५ नोव्हेंबरपासून लसीचे प्रमाणपत्र दाखवल्याशिवाय इंधन देऊ नये, असे आदेश काढले. आदेशाची कितपत अंमलबजावणी होते हे सर्व सरकारी विभागांनी तपासावे, असेही त्यांनी म्हटले होते. त्यावर कार्यवाही होते की नाही हे पाहण्यासाठी दिव्य मराठी प्रतिनिधीने गुरुवारी शहराच्या विविध भागांत फेरफटका मारला. पाहणी केली. तेव्हा अधिकारी नसले तरी पंप, दुकानचालक प्रमाणपत्र तपासणी करत होते असे दिसले. उस्मानपुरा प्रमाणपत्र तपासणीला वेळ लागत असल्याने लांब रांगा लागल्या होत्या. तेथे एका वेळी एकाच वाहनाला प्रवेश दिला जात होता. शहागंजाच्या पंपावर एक कर्मचारी प्रमाणपत्र तपासून कुपन देत होता. कुपन दाखवणाऱ्याला इंधन मिळत होते. पोलिस दल, मनपाच्या पंपावरही काटेकोर तपासणी होत होती. जटवाडा येथील पंपावर गांभीर्याने प्रमाणपत्र पाहिले जात नसल्याचे निदर्शनास आले.

मॉल, टॉकीजमध्ये अशी स्थिती
संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील डीमार्टमध्ये दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक होते. एक डोस घेतला असल्यास अँटिजन टेस्ट केली जात होती. औरंगपुऱ्यातील टॉकीजमध्येही असाच नियम होता. मद्य विक्रीच्या दुकानांवर ‘नो व्हॅक्सिन, नो लिकर’ असे फलक लावून त्याची अंमलबजावणीही केली जात हाेती.

पेट्रोल पंपावर आजपासून हाेणार लसीकरण
जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार जिल्हा पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनतर्फे २६ नोव्हेंबरपासून क्रांती चौकातील हिंद सुपर, उल्कानगरीतील साई शरण आणि दिल्ली गेट येथील एन. ए. प्रिंटर पंपावर लस दिली जाणार आहे, असे मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. ते म्हणाले की, २४ नोव्हेंबर रोजी २० हजारांपेक्षा अधिक जणांनी लस घेतली. त्यातील १५,६२६ जणांनी पहिला, तर ४५११ लोकांनी दुसरा डोस घेतला. सहा नोव्हेंबरपासून शहरात १० टक्क्यांनी लसीकरण वाढले. बुधवारपर्यंत ६८.३८ टक्क्यांनी लस घेतली आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण नऊ टक्क्यांनी वाढले आहे. या मोहिमेत सुमारे सव्वा लाख जणांनी लस घेतली आहे, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...