आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरणाचा अजब फंडा:45 वर्षांपुढील येईनात अन् 18+ इच्छुकांना नियमांची बाधा; नियमांच्या कचाट्यात अडकली मराठवाड्यातील लसीकरण मोहीम

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डोसचे अंतर वाढवल्याने संख्या कमी

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. ती थोपवण्यासाठी जास्तीत जास्त कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देणे अत्यंत आवश्यक आहे. मध्यंतरी पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्यानंतर लसीकरण केंद्रांवर नागरिक पहाटेपासून रांगा लावत होते. पण १८ वर्षांपुढील नागरिकांना लस देणे तूर्त थांबवण्यात आले व ४५ वर्षांपुढील नागरिक लस घेण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येत नसल्याने सर्वच जिल्ह्यांत लसीचा साठा शिल्लक राहत आहे. नियमांच्या कचाट्यात लसीकरणाची मोहीम अडकल्याचे दिसते.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांतील आढावा घेतला असता १० ते १६ टक्क्यांच्या जवळपास लसीकरण झाले आहे. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमीच आहे. कोविशील्ड लसीचा दुसरा डोस घेण्यासाठीचा कालावधी ८४ दिवसांवर केल्याने पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची केंद्रावर होणारी गर्दीही आपोआप कमी झाली. शिवाय जूनमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने घटत असल्याने नागरिक लसीकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मान्सूनने जोरदार आगमन केल्याने ग्रामीण भागात लोक पेरणीच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळेही केंद्रावरील संख्या घटत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

आठ जूनपर्यंतची लसीकरणाची स्थिती
जिल्हा पहिला डोस दुसरा डोस एकूण लसीकरण
बीड ३,१२,६११ ९५,0३० ४,०७,६४१
जालना २,७१,४८३ ६१,४७३ ३,३२,९५९
हिंगोली १,११,0३८ ३२,७८४ १,४३,८२२
उस्मानाबाद २,३४,९९८ ४८,३४९ २,८३,३४७
नांदेड ३,५१,२४९ ९४,६८३ ४,४५,९३२
परभणी २,२७,२७८ ५५,१२३ २,८२,४०१

विभागातील जिल्ह्यांची स्थिती अशी
जिल्हा केंद्र सुरू रोज लसीकरण शिल्लक साठा
जालना ८२ ३,५०० ८,५००
परभणी ७९ ३,००० ३५,८००
हिंगोली २९ २,००० १३,०००
नांदेड ९४ ४,५०० ५,६७,३३०
बीड ७९ ३,००० २२,०००
उ.बाद नियोजनानुसार १८,०००

डोसचे अंतर वाढवल्याने संख्या कमी
कोरोना विषाणूची दुसरी लाट ओसरत असल्याने व पेरणीची कामे सुरू असल्याने लसीकरणासाठी नागरिक कमी येत आहेत. तसेच कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी कालावधी वाढवल्याने केंद्रांवर संख्या कमी दिसत आहे. लसीकरणासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करून लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी भविष्यातील संभाव्य तिसऱ्या लाटेच्या आधी लसीकरण आवश्यक आहे. - डॉ. रावजी सोनवणे, जिल्हा लसीकरण अधिकारी, परभणी.

जालना जिल्ह्यात लसीकरणाला प्रतिसाद
जालना जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिाद आहे. नागरिक ऑनलाइन प्रक्रिया झाल्यानंतर काही वेळा अगोदरच येऊन बसतात. काही जण ऑफलाइनही लसीकरणासाठी येत असतात. - मनीष जाधव, औषधनिर्माण अधिकारी, जालना.

बातम्या आणखी आहेत...