आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोसमधील अंतर 84 दिवस:9,250 चे उद्दिष्ट, जेमतेम 1,030 जणांनी घेतली लस; लोकांची गर्दी ओसरू लागली

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: हरेंद्र केंदाळे / मंदार जोशी
  • कॉपी लिंक
  • 71 केंद्रांवर तैनात 426 कर्मचारी दिवसभर वाट पाहत राहिले
  • 45+ नागरिकांनी मोठ्या संख्येने केंद्रावर येण्याचे मनपाचे आवाहन

एकीकडे तुटवडा असल्याने लस मिळत नाही असे चित्र आहे, तर दुसरीकडे औरंगाबादेत लस उपलब्ध असूनही लोक फिरकत नाहीत. मंगळवारी ७८०० लस उपलब्ध होत्या. पण फक्त १२४३ जणांनी ती घेतली. बुधवारी ९२५० जणांना पहिला, दुसरा डोस देण्याची क्षमता होती. ७१ केंद्रांवर ४२६ कर्मचारी तैनात केले होते. पण जेमतेम १०३० जण केंद्रांवर आले. तीन आठवड्यांपूर्वी लस मिळवण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. अनेक केंद्रांवर वादावादी होत होती. मनपाचे कर्मचारी, काही राजकीय मंडळी वशिलेबाजी करत असल्याचा आरोपही झाला. १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस देणे बंद झाले. काही दिवस पहिला डोसही थांबवण्यात आला. मात्र, तीन दिवसांपासून वेगळेच चित्र दिसत आहे.

लसीचा बऱ्यापैकी साठा येत आहे म्हणून ४५ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी पहिला आणि दुसरा डोस देण्याचा निर्णय झाला. त्याचा उपयोग होत नसल्याचे दिसून आले. एन-११ केंद्रावरील डॉ. रवी सावरे म्हणाले की, पहिल्या आणि दुसऱ्या डोसमधील अंतर ८४ दिवस केल्याने गर्दी ओसरली आहे. आरोग्य अधिकारी डाॅ. नीता पाडळकर म्हणाल्या की, शासनाकडून आदेश आल्यावरच १८ पेक्षा अधिक वयाच्या लोकांना पहिला डोस मिळेल. ४५ वर्षांवरील लोकांनी पहिला डोस घेण्यासाठी यावे यासाठी नियोजन सुरू आहे.

जय्यत तयारी केली, पण...
औरंगाबाद शहराची लोकसंख्या लक्षात घेता ४५ वर्षांवरील लोक मोठ्या संख्येने येतील अशी मनपा प्रशासनाची अपेक्षा होती. त्यानुसार प्रत्येक केंद्रावर एक नर्स, एक डाटा एन्ट्री ऑपरेटर, विश्रांती कक्षात एक आशा अथवा अंगणवाडी सेविका, नोंदणीसाठी शिक्षक अथवा अंगणवाडी सेवक, एक वैद्यकीय अधिकारी, एक हेल्पर अशी जय्यत तयारी केली. काही केंद्रांवर दुप्पट नियुक्ती केली, पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

लाभार्थींना केंद्रावर आणण्याचे नियोजन सुरू
शासन आदेशाने ४५ पेक्षा जास्त वयाच्या लाभार्थींना लसीकरण सुरू आहे. शासन आदेश आल्यावरच १८ पेक्षा जास्त वयाच्या लाभार्थींना लसीकरण करू. ते लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे सध्या ४५ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. लसींची उपलब्धता आहे. नंतर अडचण येऊ शकते. तसेच या लाभार्थींना लसीकरण करून घेण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. - डॉ. नीता पाडळकर, आरोग्य अधिकारी

बातम्या आणखी आहेत...