आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूज:सकाळी खेळताना बेपत्ता झाली होती चिमुकली, दुपारी साडे अकराच्या सुमारास घरातील धोकादायक सेफ्टी टँकमध्ये सापडला मृतदेह

वाळूज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांत माहिती सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

वाळूज येथील शिवाजीनगरमध्ये राहणारी गौरी वैभव बगाडे (वय साडेतीन वर्ष) ही चिमुकली तिच्या चुलत आजोबांच्या तेराव्याच्या कार्यक्रमानिमित्ताने आई-वडिलांसोबत घरालगतच आजोबांच्या घरी ३० मे रोजी सकाळी साडेआठवाजेच्या सुमारास आली होती. दरम्यान समवयस्क लहान मुलांसोबत लपाछपी खेळत असताना ती सकाळी साडेनऊच्या सुमार अचानक बेपत्ता झाली होती. दरम्यान ती ज्याठिकाणी खेळत होती तेथील घरमालक मंगेश हेंद्रे यांच्या घरातील धोकादायक सेफ्टी टॅंकमध्ये पडल्याने गुदमरून गौरी ठार झाल्याची घटना ११.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत गौरीच्या चुलत आजोबांचा ३० मे रोजी १३ व्या चा कार्यक्रम असल्याने गौरी सकाळी लवकरच घरालगतच राहणाऱ्या आजोबांच्या घराकडे आई-वडिलांसोबत आली होती. घरातील महिला स्वयंपाकात व पुरुष इतर कामात व्यस्त असल्याने गौरी व इतर चिमुकले वेगवेगळे खेळ खेळण्यात व्यस्त होते. याचवेळी लपाछपी खेळणारी गौरी घराच्या प्रवेशद्वारातून आत येताच जिन्यालगत दोन्ही वाजूने असणाऱ्या अंदाजे आठ ते दहा फूट सेफ्टी टॅंकच्या दिशेने गेली. त्यानंतर ती बेपत्ता झाली. सोबतचे लहान मुले तिचा शोध घेऊन थकल्यानंतर त्यांनी ही गोष्ट घरातील मोठ्या मंडळींना सांगितली. त्यानंतर गौरीचा सर्वत्र शोध सुरू झाला.

पोलिसांत माहिती सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
साडेतीन वर्षीय चिमुकलीचा काही नातेवाईक घरालगत शोध घेत होते तर काहींनी वाळूज पोलीस ठाणे गाठून गौरी बेपत्ता झाल्याची माहिती दिली. यातील काहींनी वाळूज परिसरातील व्हाट्सएपच्या अनेक ग्रुपवर गौरी बेपत्ता असून कोणाच्या नजरेस पडली तर तात्काळ पोलिसांना किंवा नातेवाईकांना माहिती द्यावी अशी पोस्ट व्हायरल झाली होती.

गौरीचा मृतदेह बाहेर काढला
सर्वत्र शोधाशोध सुरू झाल्यानंतर घरमालक हेंद्रे यांच्याकडे भाड्याने राहणाऱ्या एका भाडेकरू महिलेने लहान मुलं त्या धोकादायक खड्ड्याच्या दिशेने खेळत असल्याचे नागरिकांना व नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ पाणी उपसणाऱ्या वाहनाला पाचारण केले. पुढे मोटारीच्या मदतीने आतील दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर काढण्यास सुरुवात झाली अवघ्या २० मिनिटांमध्ये मृतावस्थेत असणारी गौरी पाण्यात आढळून आली तिला पाण्याबाहेर काढतात तिच्या आई-वडिलांनी व नातेवाइकांनी हंबरडा फोडण्यास सुरुवात केली पुढे पोलिसांच्या मदतीने बेशुद्धावस्थेत गौरीला घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले.

घरमालकाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू
सदरील घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी दोन मजली इमारतीमध्ये घर मालक मंगेश हेंद्रे यांच्या तब्बल २९ खोल्या आहेत. तळ मजल्यावर जिन्यालगत दोन्ही बाजूने कायम उघड्या अवस्थेत असणारे दोन खड्डे आहेत. याठिकाणी पूर्वी पिण्याच्या पाण्याचा हौद असल्याचे हेद्रे सांगतात पण काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी ड्रेनेजचे घाण पाणी येत असल्याने सदरील हौद वापरणे बंद केले. त्यानंतर त्यात दुर्गंधीयुक्त पाणी साचतच गेले आणि त्याकडे कायम दुर्लक्ष झाल्याने उघड्यावर असणाऱ्या या दहा फूट खोल व साधारण दोन फूट रुंद खड्यात पडून निरागस गौरीचा मृत्यू झाला. जर हे धोकादायक खड्डे बुजवून किंवा त्यावर झाकण लावून बंद करण्यात आले असते तर गौरचे प्राण वाचले असते.

याच ठिकाणी गोदावरी पब्लिक स्कूल
ज्या इमारतीमध्ये ही घटना घडली त्या ठिकाणी तळ मजल्यावर एका शटरमध्ये गोदावरी पब्लिक स्कूल सुरू होती. सध्या लॉकडाऊन असल्याने शाळा बंद आहे. गौरी सोबत घडलेली घटना इतर चिमुकल्या विद्यार्थ्यांसोबत घडण्याची शक्यता नागरिकांतून वर्तवली जात होती. स्वतः इतर ठिकाणी राहणाऱ्या व भाड्याने खोल्या देऊन त्या खोल्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या घरमालकाच्या चुकीमुळेच निष्पाप गौरीचा मृत्यू झाल्याची गावकऱ्यांमधे दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. घरमालकाने भाडेकरूची माहिती पोलिसांना दिलेली आहे का? नसेल तर त्याच्यावर कारवाई करणार का याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

या प्रकरणी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात येणार असून पुढे चौकशीतून जे सत्य समोर येईल त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. भाडेकरूंची माहिती दिलेली आहे किंवा नाही ही माहिती सध्या माझ्याकडे उपलब्ध नाही. पोलीस निरीक्षक, संदीप गुरमे वाळूज पोलिस ठाणे

बातम्या आणखी आहेत...