आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटीची बससेवा:औरंगाबादला हव्या 1600 बस 1200 कोटी रुपयांचे डिपॉझिट

रोखठोक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाणीपुरवठ्याच्या योजनेत जी चूक नेत्यांनी केली तीच आता ते सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्येही करत आहेत. १६ ते १७ लाख औरंगाबादकरांच्या वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. ही शकले झाकून टाकण्यासाठी नेतेमंडळी सखोल अभ्यास नियोजनाशिवाय सवंग निर्णय घेऊ लागली आहेत. त्यामुळे गाजावाजा करून आणलेली स्मार्ट सिटीची बससेवा ना लोकांच्या उपयोगात येते ना त्यातून महापालिकेला काही फायदा होतो. फक्त चार टक्केच लोक या बसचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. खरे तर हा आकडा एेकून सर्व नेत्यांना भोवळ यायला हवी होती.

पण तसे घडत नाही. घडणारही नाही. कारण केवळ पोकळ, अवाजवी घोषणा करण्याच्या बसमध्ये बसून ते भरधाव धावत सुटले आहेत. सध्या नव्वदपैकी चाळीस बस खराब झाल्या आहेत. त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी राखून ठेवलेली दोनशे कोटी रुपयांची ठेव नव्या रस्त्यांसाठी खर्चावी असा आग्रह त्यांनी धरला आहे. पण तेवढ्याने औरंगाबादच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत काहीही सुधारणा होणार नाही. चंदीगडमध्ये एक हजार लोकांसाठी पाच बस आहेत. थायलंडमध्ये एक हजार लोकांसाठी किमान आठ बस आहेत. संपूर्ण भारताचा अभ्यास केला तर एक हजार लोकांमागे १.२ बस आहेत. म्हणजे औरंगाबादची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या नेत्यांना खरोखरच सुधारायची असेल तर कमीत कमी १६०० बस हव्यात.

म्हणजे त्या प्रत्येक गल्लीबोळात धावतील. एका बसच्या दिवसभरात किमान दहा फेऱ्या झाल्या तरच सार्वजनिक वाहतूक यंत्रणा लोकांना फायद्याची ठरेल. सध्या शहरातील ३८ टक्के लोक दुचाकी आणि ३६ टक्के लोक रिक्षाने प्रवास करतात. एका बसचा एका फेरीत ३३ लोकांना लाभ होतो हे लक्षात घेतले पाहिजे. एकुणात या ७४ टक्के औरंगाबादकरांचा प्रवास सुखाचा आणि वेळेवर करायचा असेल तर आधी १६०० बस आणि त्यांच्या देखभालीसाठी १२०० कोटींचे डिपॉझिट आणा, अन्यथा येणाऱ्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत.

प्रणव गोळवेलकर, राज्य संपादक, महाराष्ट्र

बातम्या आणखी आहेत...