आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलदिन विशेष:"औरंगाबाद वॉटरग्रीड" केल्यास भागेल ६ लाख लोकांची तहान

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराची तहान भागवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण राबवत असलेली १६८० कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण होईल तेव्हा होईल, मात्र त्यापूर्वीच शहराची तहान भागवणे शक्य आहे. शहराभोवताली किमान ६ ते ७ मध्यम व लघु सिंचन प्रकल्प असून त्यांना जोडून “औरंगाबाद वॉटरग्रीड’ तयार केली तर त्यातून किमान ५ ते ६ लाख नागरिकांची तहान भागू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे या याेजनेसाठी १२५ ते १५० कोटींचाच खर्च येईल.

औरंगाबाद महापालिकेने बहुचर्चित समांतर जलवाहिनी प्रकल्प गुंडाळल्यानंतर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने औरंगाबादकरांसाठी १६८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना दिली. यातून प्रत्यक्षात पाणी येण्यासाठी अजून वेळ असला तरी विद्यमान प्रकल्पांच्या माध्यमातून अर्ध्या शहराची तहान भागवणे शक्य आहे. शहराच्या १७ लाख लोकसंख्येला दररोज ०.१५ दलघमी पाणी लागते. शहराभोवतालचे प्रकल्प त्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकतात.

...तर ६६ दलघमी पाणी उपलब्ध
शहराच्या चारही बाजूंच्या प्रकल्पांतून ६५ ते ७० दलघमी पाण्याचा साठा निर्माण होऊ शकतो. १ दलघमीमध्ये सुमारे १ लाख लोकसंख्येला पाणी उपलब्ध होते. चारही प्रकल्पांतून ६ ते ७ लाख नागरिकांची तहान भागवणे शक्य आहे. यासाठी भूसंपादनाची गरज नाही. त्या-त्या भागातील प्रकल्पातून भूमिगत जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा करता येईल. यामुळे कमी खर्चात प्रकल्प पूर्ण होईल. शिवाय जायकवाडीवरील ताणही कमी होईल. दरम्यान, वाल्मी व जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचा एक अहवाल सादर केला होता. मात्र त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले.

कशी असेल औरंगाबाद वॉटरग्रीड
सातारा परिसर : सातारा, देवळाई परिसरातील दोन लाख लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी परदरी साठवण तलाव व वाल्मीचे दोन तलाव महत्त्वाचे ठरू शकतात. परदरी तलावाची क्षमता २० दलघमी असून डोंगराच्या मध्यात असल्याने यातून बाष्पीभवनही कमी होते. वाल्मीच्या २ तलावांची क्षमता ४ दलघमी असून कॅनॉल नसल्याने पाण्याचा सिंचनासाठीही वापर होत नाही. १० ते २० कोटी रुपये खर्चून पाइपलाइन केल्यास २४ दलघमी पाण्यातून सातारा परिसरातील १.५ ते २ लाख नागरिकांची तहान कायमची भागू शकते.

हर्सूल परिसर:
दोल दलघमी क्षमतेचा हर्सूल तलाव, ५ दलघमी क्षमतेचा फुलंब्रीच्या सांजूळ तलावाचाही पाणीपुरवठ्यासाठी वापर योजनेसाठी शक्य आहे. खाम नदीत जलशुद्धीकरण उभारून खांब बंधाऱ्यातून ५ दलघमी पाण्याची उपलब्धता करणेही शक्य आहे. यातून हर्सूल, जटवाडा, हडकोतील काही भागात पुरेसे पाणी मिळू शकेल.

चिकलठाणा परिसर:
करमाडजवळील जळगाव, लहुकी, सुखना प्रकल्प मिळून २५ ते २७ दलघमी उपलब्धता होऊ शकते. यातून रामनगर, चिकलठाणा, विमानतळ परिसरात पाणी पोहोचवणे शक्य आहे. पूर्वी सुखना प्रकल्पातून चिकलठाणा, रामनगरपर्यंत पाणीपुरवठा केला जात होता. तो पुन्हा केला तर या भागात पाणी मिळू शकेल.

वाळूज परिसर:
वाळूज परिसरात ७ दलघमी क्षमतेचा टेंभापुरी प्रकल्प आहे. या प्रकल्पातून वाळूज, बजाजनगर, सिडको महानगरच्या नागरिकांच्या पाण्याची गरज भागू शकते.

बातम्या आणखी आहेत...