आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी संकटात:हवामान बदलामुळे राज्यामध्ये 2.58 लाख हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान

संतोष देशमुख | औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोव्हेंबर ते २४ जानेवारीदरम्यान अधूनमधून महाराष्ट्रात वादळी वारे वाहिले, पाऊस पडला व गारपीटही झाली. या हवामान बदलामुळे २ लाख ५८ हजार ६६ हेक्टरवरील फळपिकांचे अतोनात नुकसान झाल्याची नोंद राज्य कृषी विभागाने घेतली आहे. हिवाळ्यात स्वच्छ प्रकाश पडून गुलाबी थंडी जाणवत असते. पण हवामान बदलामुळे ऋतुचक्रच बदलले आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बाराही महिने पाऊस पडण्याचा विक्रम झाला आहे. विशेषत: नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या थंडीच्या प्रमुख महिन्यांत १५ जिल्ह्यांत जेथे पोषक वातावरण तेथेच कमीअधिक फरकाने वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस पडला. गारपीटही झाली. यात प्रामुख्याने कोकण, पुणे, नाशिक, कोल्हापूर, विदर्भ व औरंगाबाद, लातूर विभागात नैसर्गिक आपत्तीत पहिल्या पंधरवड्यात १६ जिल्ह्यांत आणि २८ व २९ डिसेंबरच्या अवकाळी पावसाने पुन्हा १५ जिल्ह्यांतील एकूण २ लाख ३ हजार १०६ हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान केले.

जानेवारीच्या २३ दिवसांत ३२.८ टक्के पाऊस पडला. यात पुन्हा ११ जिल्ह्यांतील ५४ हजार ९६० हेक्टर असे एकूण २ लाख ५८ हजार ६६ हेक्टरवरील गहू, ज्वारी, मका, भात, नागली, भादली, ओवा, तूर, हरभरा, कडधान्य, केळी, आंबा, द्राक्ष, डाळिंब, स्ट्रॉबेरी, कलिंगड, भाजीपाला, कांदा, ऊस, फूल आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

आता तीव्र थंडीचा मारा

उत्तरेतील अतिशीत वारे आपल्याकडे वाहून येत आहेत. गत २४ जानेवारीपासून किमान व कमाल तापमानात ७ अंशांपर्यंत मोठी घसरण झाली आहे. १ ते २ अंश सेल्सियस तापमान कमी झाल्यास थंडी पडली असे म्हणतात. सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी घसरण झाल्यास सौम्य थंडीची लाट तर ५ ते ७ अंशांपर्यंत घट झाल्यास तीव्र थंडी म्हटले जाते. सध्या महाराष्ट्रात तीव्र थंडीच्या लाटेमुळे गव्हाच्या पिकाला फायदा होत असून उर्वरित पिकांवर मात्र विपरीत परिणाम होत आहे.

संवेदनशील पिके असून द्राक्षे फुटत आहेत. फळपिकांची कोवळी पाने अतिशीत वाऱ्याने होरपळून निघत आहेत. शाळू ज्वारीवर चिकटा पडत आहे. उत्पादन खर्च अधिक असून हवामान बदलाचे पीक वाढ, पोषण ते उत्पादनावरच दुष्परिणाम होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याची कृषी विभाग व विमा कंपन्यांनी नोंद घेऊन १०० टक्के नुकसान भरपाई मिळणे नितांत गरजेचे आहे.

आंबा मोहरावर परिणाम
थंडीत ढगांची गर्दी अधिक काळ राहून अधूनमधून पाऊस पडत आहे. कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढला. याचा आंबा फळबागेवर थेट परिणाम झाला असून हापूस, केसर आदी आंबा उत्पादनात १५ टक्क्यांवर घट येण्याचा प्राथमिक नजरअंदाज फलोत्पादनतज्ज्ञ डॉ. भगवान कापसे यांनी वर्तवला आहे. तसेच तीव्र थंडीमुळे आंबा लगडणे व काढणी लांबणीवर पडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...