आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुख वार्ता:औरंगाबाद होणार ‘ग्रीव्हज कॉटन’च्या इंजिन निर्मितीचे हब, रोजगार वाढणार; देशभरातील प्रकल्प औरंगाबादेत हलवणार

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

इंजिन, रिटेल आणि ई-व्हेइकलमध्ये आघाडीचे नाव असणारी ग्रीव्हज कॉटन लिमिटेड औरंगाबादमध्ये विस्तारासाठी सज्ज असून कंपनी वेगवेगळ्या शहरातील इंजिन निर्मितीचे प्रकल्प औरंगाबादेत हलवत आहे. तर तामिळनाडूच्या रानीपेट प्रकल्पाच्या जागेत इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा भव्य प्रकल्प उभारणार आहे. औरंगाबादेत विस्तारामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल.

१८५९ मध्ये जेम्स ग्रीव्हज आणि जाॅर्ज कॉटन यांनी सुरू केलेली ही कंपनी वाहनांसाठी पेट्रोल व डिझेल इंजिन (ऑटोमोटिव्ह इंजिन), जेनसेट, पंपसेट तसेच शेती व बांधकामासाठी लागणारी उपकरणे तयार करते. कंपनीचे पुणे, औरंगाबाद, नोईडा, कोइम्बतूर व चेन्नईच्या रानीपेट येथे प्रकल्प आहेत. औरंगाबादच्या चिकलठाणा व शेंद्रा एमआयडीसीतील प्रकल्पात ऑटोमोेटिव्ह इंजिनची निर्मिती होते.

औरंगाबादमध्ये स्थलांतर : कंपनीने इलेक्ट्रिक व्हेइकलच्या निर्मितीत विशेष लक्ष घातले असून “अम्पियर इलेक्ट्रिक’ ही कंपनी सुरू केली आहे. याअंतर्गत ई-स्कूटर बाजारात आणल्या आहेत. ई-व्हेइकल निर्मितीचा प्रकल्प रानीपेट येथे सुरू केला जाणार असून त्यासाठी तेथील तसेच अन्य शहरातील इंजिन निर्मिती प्रकल्प औरंगाबादमध्ये हलवण्याचा निर्णय घेतल्याचे कंपनीच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

पुण्यातील जागेची ३२० कोटीत विक्री : कंपनीने पुणे-मुंबई महामार्गावरील प्रकल्पातील २७ एकर अतिरिक्त जमीन एक बांधकाम व्यावसायिक रुणाल डेव्हलपर्सला ३२० कोटी रुपयांत विकली आहे. मार्च २०२२ पर्यंत तीन टप्प्यात देणी अदा करून व्यवहार पूर्ण केला जाईल.

शहराला होणार फायदा
- ग्रीव्हज कॉटनचा चिकलठाणा एमआयडीसीत ३० एकर जागेवर २ प्लांट आणि एक संशोधन आणि विकास प्रकल्प आहे.
- शेंद्रा एमआयडीसीत १७ एकरवर एक प्लांट आणि एक संशोधन प्रकल्प आहे. दोन्ही मिळून २००० जणांना रोजगार मिळाला आहे.
- नवीन प्रकल्प आल्यावर रोजगारात वाढ होईल. यात अधिकाधिक स्थानिक मनुष्यबळाला संधी दिली जाईल.

बातम्या आणखी आहेत...