आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीत चढउतार:राज्यात थंडीत चढउतार, अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता,पुढील आठ दिवस आकाशात ढगही घोंघावणार

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हवामानात वेगाने बदल होत आहेत. गारपीट व पावसाचे वातावरण निवळून किमान व कमाल तापमानात वाढ झाली आहे. पुढील आठ दिवस उष्ण, बाष्प, शीत वाऱ्यांचा संगम होऊन आकाशात ढगही घोंघावणार आहेत. त्यामुळे थंडीत खंड, चढउतार होतील. जेथे हवेचा दाब कमी होईल अशा मोजक्या ठिकाणी हलका पाऊसही पडण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली.

उत्तरेत बर्फवृष्टी होत आहे. तिकडील अति शीत वारे व समुद्रावरून बाष्पयुक्त वारे वाहून येत आहेत. कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. उष्ण, शीत, बाष्पयुक्त वाऱ्यांचा आकाशात संगम होऊन मंगळवार ते शुक्रवारदरम्यान तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडला व गारपीटही झाली. कमाल तापमानात ८ अंशांची मोठी घसरण होऊन २९ डिसेंबर रोजी २१.७ अंश नीचांक पातळीवर खाली घसरण झाली होती. किमान तापमान सरासरीपेक्षा ३ अंशांपर्यंत वाढले होते. म्हणजेच रात्रीच्या तुलनेत दिवसा कडाक्याची थंडी जाणवली.

शनिवारपासून पावसाचे वातावरण निवळले आहे. कमाल तापमान २१.७ वरून २८.६ अंशांपर्यंत वाढले. आर्द्रताही ६० ते ८० टक्क्यांपर्यंत राहत आहे. दिवसाचे तापमान सरासरीच्या तुलनेत १ अंशांनी किंचित जास्त, तर रात्रीचे तापमान ३ अंशांनी वाढलेले आहे. पुढे आठ दिवस थंड, उष्ण, बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होऊन आकाशात ढग घोंघावणार आहेत. त्यामुळे थंडीत चढउतार होईल. तसेच जेथे कमी हवेचा दाब निर्माण होईल तेथेच ७ ते ९ जानेवारीच्या दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली.

अवकाळी पावसामुळे रब्बी पिकावर संकट
थंडीच्या दिवसांत अवकाळी पावसामुळे रब्बी पिकावर नैसर्गिक संकटाचे सावट निर्माण झाले आहे. हवेचा दाब, वेग, बाष्पयुक्त आणि शीत, उष्ण वारे व स्थानिक वातावरणावर पावसाची स्थिती अवलंबून राहील. सर्वदूर पाऊस पडणार नाही. जेथे पावसासाठी पोषक वातावरण तिथे मात्र अतोनात नुकसान होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...