आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:कोविडच्या नियमांना पायदळी तुडवून जिल्हा परिषद सदस्यांचा जंगी वाढदिवस साजरा, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

वाळूज (संतोष उगले)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा परिषद अध्यक्षा, सभापती आदींवर गुन्हे दाखल करणार - जिल्हाधिकारी

औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना एकीकडे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग कोरोनाचे रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करत असतानाच, दुसरीकडे मात्र, लोकप्रतिनिधी बिनदिक्कतपणे कोरोनाचे नियम मोडीत काढून जंगी वाढदिवस व इतरही विविध कार्यम पंढरपूर, वडगाव कोल्हाटी, बजाजनगर आदी ठिकाणी करताना दिसले. उल्लेखनीयबाब म्हणजे सदरील कार्यक्रमाची कुठलीही पोलीस परवानगी न घेता शेकडो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करून नियमांची पायमल्ली करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूरचे जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भव्य मंडप लावून शेकडो गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम घेतला. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची परवानगी नसणाऱ्या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके, जि. प.चे आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश गलांडे, जि. प.सदस्य सय्यद कलीम यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी सॅनिटायझर करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली नव्हती.

जर लोकप्रतिनिधीच असे वागत असतील तर?
कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षा शेळके यांच्यासह सर्वच लोकप्रतिनिधी विनामास्क उपस्थित होते. एकीकडे नागरिकांना कोरोना संदर्भात जनजागृती करणारे लोकप्रतिनिधी दुसरीकडे स्वतःच्या कार्यक्रमात किती हलगर्जीपणा दाखवतात याचे मूर्तिमंत उदाहरण सदरील कार्यक्रम ठरला. विकास कामाचे भूमिपूजन करतेवेळीसुद्धा मास्क लावण्याची तसदी संबंधितांनी घेतली नाही.

कसा येणार कोरोना आटोक्यात?
कार्यक्रमस्थळी किमान चार ते पाचशे रहिवासी नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. त्यांच्यासाठी उघडयावरच भजी व जिलेबीच्या नाश्त्यासाठी सोय करण्यात आली होती. विनामास्क लावलेले चिमुकले नाश्तास्थळी तुटून पडले होते. पुढे माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे निदर्शनास येताच मान्यवरांनी मास्क लावले व इतरांनीसुद्धा लावावे अशी सूचना विनामास्क सूत्रसंचालन करणारे शाळेचे मुख्यध्यापक प्रकाश दाणे देत होते.

जेसीबीच्या मदतीने गळ्यात माळा
जंगी वाढदिवसाच्या निमित्ताने गायकवाड यांच्या गळ्यात भव्य पुष्प माळा टाकण्यासाठी थेट जेसीबीची व्यवस्था करण्यात आली होती. गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मास्क तोंडाला लावलाच नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्याकडून काय धडा घ्यावा असा प्रश्न उपस्थित होतो.

चौकशी करून थेट गुन्हे दाखल करणार
विनापरवानगी कार्यक्रम घेण्यात आला असेल तर या संदर्भात चौकशी करण्यात येईल, चौकशीत जर तसे समोर आले तर थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा यांच्यासह संबंधित जिल्हा परिषद सदस्य व इतरही लोकप्रतिनिधी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील.
सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी औरंगाबाद

सदरील कृत्य हे बेकायदेशीर आहे. आमच्या पोलीस प्रशासनाने सदरील कार्यक्रमाला कुठलीही परवानगी दिली नव्हती त्यामुळे याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत. मधुकर सावंत, पोलीस निरीक्षक, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे

बातम्या आणखी आहेत...