आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुशखबर:सलग 15 महिन्यांपासून औरंगाबादकरांना मिळतेय शुद्ध हवा; लॉकडाऊनचा पर्यावरणाला फायदा

औरंगाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरातील निवासी वसाहतींसह औद्योगिक भागातील प्रदूषणाची पातळी आटोक्यात

जागतिक पर्यावरणदिनी आनंदाची बातमी आहे. काेराेनाच्या काळात गेल्या वर्षीपासून वारंवार लावण्यात आलेेल्या लॉकडाऊनमुळे शहराच्या प्रदूषण पातळीत सलग १५ महिने घट होत आहे. यामुळे या काळात शहरवासीयांना शुद्ध हवा मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये बहुतांश व्यवहार सुरू असल्याने प्रदूषण करणाऱ्या घटकात दुपटीने वाढ झाली तरी ती मर्यादेत असल्याचे समाधान आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने शहरात ४ ठिकाणी हवेच्या गुणवत्तेच्या चाचण्या घेतल्या जातात. कोरोना रोखण्यासाठी २३ मार्च २०२० पासून लॉकडाऊन लावण्यात आला. मधल्या काळातील अनलॉकनंतर २२ एप्रिल २०२१ पासून पुन्हा लॉकडाऊन लागला. या काळात शहरातील प्रदूषण समाधानकारक राहिल्याचे मंडळाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

हवेतील प्रदूषण मोजण्यासाठी धूलिकण, सल्फर डायऑक्साइड (सॉक्स) आणि नायट्रोजन ऑक्साइडचे (नॉक्स) तपासले जाते. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान जनजीवन सुरळीत सुरू होते. यामुळे चारही घटक समाधानकारक श्रेणीत होते. एप्रिल आणि मेदरम्यान कडक लाॅकडाऊनमुळे चारही घटक उत्कृष्ट श्रेणीत आले.

यंदा प्रदूषणात काहीशी वाढ
२०२१ च्या जानेवारी आणि फेब्रुवारीत चारही निकषांवर प्रदूषणाची पातळी गेल्या वर्षीच्या बरोबरीने होती. मार्चच्या पहिल्या आठवड्यात धूलिकण आणि एक्यूआयमध्ये वाढ झाली. जिल्हा प्रशासनाने पुन्हा २२ एप्रिलपासून लॉकडाऊन लागू केला. मात्र, वाहतूक, उद्योग, बाजारपेठा यावर मागील वर्षाप्रमाणे निर्बंध नव्हते. यामुळे गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमधील १ एप्रिलच्या तुलनेत यंदा सॉक्सचे प्रमाण ९ मायक्रोगॅम प्रति घनमीटरहून २० वर पोहोचले. नॉक्सचे प्रमाण २१ वरून ३९, धूलिकण २८ वरून ७३, तर एक्यूआयमध्ये तिप्पट वाढ झाली आहे. मेमध्येही ही वाढ कायम होती. तरी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषाप्रमाणे ही वाढ आटोक्यात राहिली.

सातत्य कायम राहावे
यंदा लॉकडाऊनमध्ये कडक निर्बंध नसल्याने प्रदूषण करणाऱ्या घटकांत वाढ झाली. दुसरीकडे निसर्गाची वहनक्षमताही वाढली आहे. यामुळे प्रदूषकांत वाढ होऊनही त्यांनी मर्यादा ओलांडलेली नाही. निसर्गाचे हे बदललेले रूप कायम ठेवण्यासाठी वाहनांचा मर्यादित उपयोग, कचरा जाळण्यावर निर्बंध, उद्योगांमध्ये प्रदूषण नियंत्रण उपाययोजना, ऑक्सिजन पार्क उभारण्यासारखे उपाय अावश्यक आहेत. - प्रा. डॉ. सतीश पाटील, पर्यावरणशास्त्र विभाग, विद्यापीठ

वाळूजचे प्रदूषणही आटोक्यात
उद्योगनगरी वाळूजचा गेल्या वर्षी जानेवारीत एक्युूआय १०५, फेब्रुवारीत ६९ तर मार्चमध्ये ७३ होता. लॉकडाऊन लागल्यावर एप्रिलमध्ये तो ३५, तर मेमध्ये ४९ पर्यंत खालावला. यंदा लाॅकडाऊनमध्ये उद्योग, वाहतूक सुरू असल्याने एक्युूआय (एअर क्वाॅलिटी इंडेक्स) जानेवारीत ९५, फेब्रुवारीत ८४, मार्च ९५, एप्रिल १०२, तर मेमध्ये ८० होता. गेल्या वर्षी आणि या वर्षी धूलिकणांचे प्रमाण पुढीलप्रमाणे होते. जानेवारी १०८/९५, फेब्रुवारी ६९/८४, मार्च ७३/९५, एप्रिल ३५/१०३ आणि मे ४९/८०. यंदा यात वाढ झाली असली तरी ती धाेकादायक नसून समाधानकारक आहे.

बातम्या आणखी आहेत...