आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:बुलेट रायडर आकांक्षाची ‘इंडिया बुक वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; जम्मू-काश्मीरमधील दुर्गम भागात 1300 किमीचा बुलेटवर केला प्रवास

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिला रायडरचा ग्रुप बनवणार

बुलेटने लेह, लडाखला जाणाऱ्या साहसी तरुणांची कमतरता नाही. पण, एकाच वेळी खार्दुंगला, चांगला आणि तांगलांगला या तिन्ही कठीण ठिकाणांवर बुलेट चालवून औरंगाबादच्या आकांक्षा तम्मेवार (१९) हिने विक्रम स्थापित केला. एकाच वेळी आणि पहिल्याच प्रयत्नात आकांक्षाने ५५० सीसी क्षमतेच्या रॉयल एन्फील्ड बुलेटने सफर पूर्ण केली. इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिची नोंद झाली आहे.

पुण्या-मुंबईच्या धर्तीवर बाइक रायडर्स तरुणींचा क्लब तयार करण्याची इच्छा असल्याचे आकांक्षाने गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी तिची आई सीमा, वडील धनंजय, काका लक्ष्मीकांत आणि सूर्यकांत शिरपेवार उपस्थित होते. आकांक्षा म्हणाली, वयाच्या अठराव्या वर्षी मी बुलेट चालवणे शिकले. लेह-लडाखमध्ये बुलेट चालवण्याची माझी इच्छा होती. वडिलांना विचारल्यानंतर त्यांनी तत्काळ होकार दिला. मीदेखील सोबत येणार अशी अट घातली. मला ही राइड पूर्ण करायची होती.

आजवर अनेक तरुणींनी ही राइड केली. मात्र, इतक्या कमी वयाची मी पहिलीच अाहे. हा प्रवास साेपा नव्हता. यासाठी सहा ते आठ महिने ऑफ रोड गाडी चालवण्याचा सराव केला. ३ जून २०२१ ला औरंगाबादेतून प्रवास सुरू केला. श्रीनगरला विमानाने गेले. त्यानंतर सोनमर्ग येथून प्रत्यक्ष बाइक राइड सुरू झाली. हा एक चित्तथरारक अनुभव होता. एक छोटीशी चूक जिवावर बेतणारी होती. द्रास, कारगिल, सुमेर, नुब्रा, पेंगोंग, सर्चू, जिस्पा, अटल टनेल, रोहतांग असा प्रवास करत मी शेवटी मनालीला पोहोचले. जवळपास १३०० किलोमीटर बुलेट चालवली. या संपूर्ण प्रवासादरम्यान वडील पूर्णवेळ सोबत होते. १८ दिवसांत हा प्रवास पूर्ण केला.

महिला रायडरचा ग्रुप बनवणार
जम्मू-काश्मीर, लेह, लडाख तसेच हिमाचल प्रदेशाच्या स्थानिक लोकांनी आकांक्षाचे मनोबल वाढवले. मनालीतील बॉब अॅडव्हेंचर्स ग्रुपने तांत्रिक सहकार्य केले. सध्या सांगली येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारी आकांक्षा देवगिरी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. एनसीसीमध्ये ती ज्युनियर अंडर ऑफिसर होती. तिने एनसीसीच्या ए, बी व सी परीक्षा ए ग्रेडने पास केल्या आहेत. तिला साहसी उपक्रम, ट्रेकिंगची आवड आहे. आगामी काळात औरंगाबाद शहरात पुणे, मुंबईप्रमाणे हौशी बाइक रायडर महिलांचा ग्रुप तयार करण्याची माझी इच्छा असल्याचे आकांक्षा म्हणाली.

बातम्या आणखी आहेत...