आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत जि. प. अध्यक्षांचा बीजेपीत प्रवेश:काँग्रेसने भाग पाडल्याने घेतला निर्णय; आगामी काळात भाजपचाच अध्यक्ष होणार

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सत्तांतर झाले त्याचप्रमाणे आता जिल्ह्यातही राजकारण बदलायला सुरुवात झाली आहे. औरंगाबाद जि. प. च्या माजी अध्यक्ष मीना शेळके यांनी त्यांचे पती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असलेल्या रामूकाका शेळके यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्याच लोकांनी आपल्याला हा निर्णय घ्यायला भाग पाडल्याचे शेळके दाम्पत्यांनी सांगितले. तर आता भाजपची ताकद आणखी वाढणार असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

जि. प. निवडणुकीच्या तोंडावर मिनी मंत्रालयातही काही बदल होत आहेत. त्यामुळे भाजपची ताकद जिल्हा परिषदेत आणखी वाढली असून, येणाऱ्या निवडणूकीत भाजपचाच अध्यक्ष होणार यात आता काही शंका नसल्याचे भाजपचे माजी जि.प.सदस्य मधुकर वालतुरे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलतांना सांगितले.

प्रारंभापासून शिवसेना-भाजपकडे कल

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी तथा औरंगाबाद जि. प.च्या माजी अध्यक्ष मीना शेळके पती रामुकाका शेळके यांच्यासह गुरूवारी 4 ऑगस्ट रोजी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल झाले. काँग्रेस सोडण्याची आपली इच्छा नसून आपणास भाग पाडले गेल्याचे रामुकाका शेळके यांनी सांगितले. आपण वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे प्रारंभापासूनच आपला कल शिवसेना आणि भाजपकडे होता. आपल्या समर्थकांनी भाजपमध्ये जाण्यास अनुकुलता दर्शविल्यामुळे आपण प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बाहेरचा रस्ता दाखवला

मीना शेळके 2017 मध्ये काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषदेवर करमाड गटातून निवडून आल्या होत्या. काँग्रेसने त्यांना शिक्षण सभापती म्हणून जबाबदारी दिली होती. त्यानंतर 2020 मध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून निवडुन आल्या होत्या. रामुकाका शेळके यांनी बोलताना सांगितले की, कॉंग्रेसने संधी दिल्यामुळे आपण तालुकाध्यक्ष झालो. पत्नीला जि. प. सदस्य होता आले. परंतु आपणास बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी काँग्रेसमधील काही मंडळी उत्सुक होती. येथे दोन गट असल्यामुळे त्याचाही त्रास सोसावा लागत होता. आपणास भाजपकडून कुठल्याच अपेक्षा नसल्याचे शेळके यांनी सांगितले. भाजप प्रवेशाची मानसिकता मागील सहा महिन्यांपूर्वीच बनविल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आता भाजपचाच झेंडा

आगामी काळात जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवायचा असल्याचे आ. हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. माजी जि. प. अध्यक्ष भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याची कल्पना आपण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आदींना दिल्याचे बागडे यांनी सांगितले. स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनाही नेहमीप्रमाणे विश्वासात घेतल्याचे त्यांनी सांगितले.

भवितव्य काय?

नुकतीच जिल्हा परिषदेच्या 70 गटांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती. ज्यात मात्तबर सदस्य आणि पदाधिकाऱ्यांना यापूर्वीच धक्का बसला आहे. जिल्ह्यात यापुर्वी जिल्हा परिषदेचे 62 गट होते. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर त्यामध्ये 8 गट वाढले असून आता एकूण 70 गट झाले आहेत. तर राज्यात ठाकरे आणि शिंदे असे शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. त्यामुळे नेमके कोणत्या गटाचे पारडे जड असेल. राज्यातील राजकारणाच्या बिघाडीचा स्थानिक निवडणूकीत आघाडी मिळवण्यासाठी फायदा होईल का हे चित्र प्रत्यक्ष निवडणूकीच्या वेळीच स्पष्ट होईल.

मिनी मंत्रालयात परिणाम

राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर मिनी मंत्रालयाच्या राजकारणावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. गेल्या वेळी भाजपचे 23 जि.प. सदस्य असतांनाही अध्यक्षपदापर्यंत जाण्याची भाजपची तयारी निशफळ ठरली. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमुळे अध्यक्षपद मिळू शकले नाही. येत्या निवडणूकीत मात्र भाजपला आपले पारडे जड ठेवायचे असल्याने सदस्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. तर काँग्रेसचे रामूकाका शेळके आणि माजी अध्यक्ष मीना शेळके यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची ताकद आणखी वाढल्याचे वालतुरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...