आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
टवाळखोरांच्या झुंडींना रोखण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत. त्यामुळे महिला-तरुणींनीच आत्मसंरक्षणासाठी ठामपणे उभे राहिले पाहिजे, भीतीरूपी अंधारावर मात केलीच पाहिजे, असे आवाहन गेल्या महिन्यात दिव्य मराठी आयोजित ‘रातरागिणी’ उपक्रमात जागरूक महिलांनी केले होते. अशातच सर्व तरुणी-महिलांना प्रेरक ठरणारी घटना रविवारी घडली. भररस्त्यात तरुणीच्या दुचाकीसमोर स्वत:ची गाडी लावून तिची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना धडा शिकवण्याचे धाडस शिवाजीनगरातील ‘रातरागिणी’ने केले. तिची आई तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्याने पोलिसांत गुन्हा नोंदला गेला. प्रमुख आरोपी मनीष मारुती शिंदेला (१८) गजाआड करण्यात आले असून दोन अल्पवयीन टवाळखोरांना ताब्यात घेण्यात आले आहे.
या रणरागिणीनेच दिव्य मराठी प्रतिनिधीला ही घटना सांगितली. ती अशी... एका महाविद्यालयात शिक्षण घेणारी २५ वर्षीय सुनंदा (नाव बदलले आहे) तिच्या धाकट्या बहिणीसोबत दुचाकीवर गारखेडामार्गे बाजारात जात होती. तेव्हा दुचाकीवरील (एमएच २० सीएफ २००२) तीन टवाळखोरांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. सुनंदाने उल्कानगरी येथील पेट्रोल पंपावर गाडी थांबवली. तेथेही हे टवाळखोर पोहोचले. पेट्रोल भरून सुनंदा बाहेर पडताच त्यांनी तिच्या दुचाकीसमोर त्यांची दुचाकी आडवी लावली. तेव्हा सुनंदाने तुमची गाडी बाजूला घ्या, मला जायचे आहे, असे सांगितले. त्यावर या टवाळखोरांनी तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिची टिंगल उडवली. ते ऐकून तिचा संयम सुटला. आता यांना धडा शिकवलाच पाहिजे, असा विचार करत ती दुचाकीवरून उतरली. टवाळखोरांच्या गाडीची चावी काढून पर्समध्ये टाकली आणि थेट घरी पोहोचली.
तिच्या घरासमोर धिंगाणा
सुनंदा असे काही करेल असे टवाळखोरांना वाटलेच नव्हते. त्यामुळे ते काही मिनिटे थबकले. पण नंतर पुन्हा त्यांच्यातील माज जागृत झाला. त्यांनी दुसरी चावी मागवली. दुचाकी सुरू करून ते थेट सुनंदाच्या घरी पोहोचले. तेथे आरडाओरड, धिंगाणा करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर तिच्या आईला शिवीगाळ, धक्काबुक्की केली. पाच मिनिटे हा प्रकार सुरू होता.
टवाळखोरांनाच संरक्षण
आवाज ऐकून गल्लीतील, आजूबाजूचे लोक जमले. त्यांनी त्या टवाळखोरांना धडा शिकवण्याऐवजी त्यांनाच संरक्षण देण्याची भाषा सुरू केली. ‘ही टुकार मुले आहेत. कशाला त्यांच्या नादी लागता. सोडून द्या. तुमची पोरीची जात आहे...’ असा सल्ला सुनंदाच्या आईला दिला. पण त्या ठाम राहिल्या. त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. काही मिनिटांतच पोलिस दाखल झाले. त्यांनी एका टवाळखोराला अटक केली. दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. मनीषला मंगळवारी न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे. यातील दोन टवाळखोरांवर जाळपोळ केल्याचा गुन्हा दाखल आहे.
राजकीय कार्यकर्ते, शिक्षकांची मुले : या प्रकरणातील एका टवाळखोराचे वडील, भाऊ स्थानिक राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते आहेत. एकाचे आई-वडील तर शिक्षक आहेत. त्यांनी तसेच स्थानिक राजकीय नेत्याने गुन्हा दाखल होऊ नये यासाठी सुनंदा व तिच्या आईवर प्रचंड दबाब टाकला होता. पण तो त्यांनी झुगारला. दोन दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले. पुढील तपास उपनिरीक्षक घोडके करीत आहेत.
मुलींशी मैत्रिणींसारखे नाते… म्हणून त्यांच्यात धाडस आले : सुनंदाच्या आईने दिव्य मराठी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, मी कायम माझ्या मुलींशी मैत्रिणींसारखा संवाद ठेवते. आपली चूक असो वा नसो, तुमच्यासोबत घडणाऱ्या सगळ्या घटना मला सांगा. मी कायम तुमच्यासोबत आहे, असे मी वारंवार म्हणत राहते. आई आपल्या पाठीशी आहे हे त्यांना माहिती असल्याने त्यांना कालच्या प्रकरणात टवाळखोरांना धडा शिकवण्याचे धाडस आले. सुनंदाच्या कुटुंबाचे शिवाजीनगर परिसरातच छोटे दुकान आहे. आई-वडील दोघेही दुकान सांभाळतात. सुनंदाची धाकटी बहीण नुकतीच ११ व्या इयत्तेत गेली आहे.
याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात ३५४ ड ( हेतू ठेवून पाठलाग करणे आणि विनयभंग करणे) कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून १७ वर्षीय इतर दोन संशयितांच्या विरोधात कारवाई सुरू आहे.
‘जाऊ द्या’ ही वृत्ती सोडा
निवडणूक प्रचारात ‘कोणालाही घाबरू नका, अर्ध्या रात्री आम्ही तुमच्या मदतीसाठी तयार आहोत,’ असे सांगणारे स्थानिक राजकीय नेते या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न करत होते. पण माझ्या मुलींच्या जागी उद्या कोणाचीही मुलगी असू शकते. त्यामुळे टवाळखोरांची ही वृत्ती कायमची ठेचली पाहिजे ही माझी भावना ठाम होती. अशा घटनात ‘जाऊ द्या, कशाला त्यांच्या नादी लागायचे..’ ही वृत्ती सोडून माझ्या मुलींसारखे धाडस प्रत्येकीने दाखवले तर टवाळखोरांना पळ काढावा लागेल, असे सुनंदाच्या आईने सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.