आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भोसले गढीला भेट, म्‍हणाले:औरंगजेबाने शेवटचा श्वास खुलताबादला घेणे हे तर मराठ्यांच्या सर्वोच्च पराक्रमाचे प्रतीक

वेरूळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्क्रिप्ट वाचून वेरूळच्या घृष्णेश्वराचा आशीर्वाद मिळत होता. आज साक्षात घृष्णेश्वराच्या दर्शनासह भोसले गढीवर येण्याचे भाग्य लाभले. येथील स्मारकाच्या विकासासाठी नुकतेच राज्य पुरातत्त्व विभागाच्या संचालकांशी बोलणे झाले आहे. येथील विकासासाठी डीपीआर तयार करण्यात येत असल्याचे कळले आहे. काबूल ते बंगाल असे राज्य करणाऱ्या औरंगजेबाला शेवटची २८ वर्षे दख्खनमध्ये गुंतवून ठेवले गेले. इतके मोठे साम्राज्य असताना औरंगजेबाला पुन्हा स्वत:च्या राजधानीत जाता आले नाही. शेवटचा श्वासही खुलताबादलाच घ्यावा लागला हे मराठ्यांच्या सर्वोच्च पराक्रमाचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काढले.

वेरूळ येथे मालोजीराजे भोसले गढी तथा स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज स्मारकाच्या पवित्र स्थळी खासदार कोल्हे यांनी रविवारी भेट दिली. या वेळी त्यांनी वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेव मंदिर येथे दर्शन घेत निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी संकल्पित समाधी मंदिर, १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांचीही भेट घेतली. औरंगाबाद येथे होत असलेल्या शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या निमित्ताने त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते म्हणाले की, औरंगाबाद येथे ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य साकारण्याची तयारी करत असताना आज या पवित्र भूमीत येण्याचा योग आला. बाबाजीराजे भोसले, मालोजीराजे भोसले, व्यंकोजीराजे भोसले, विठोजीराजे भोसले, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे तथा माँसाहेब जिजाऊ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत नतमस्तक झाल्यानंतर एक अनंत पटीने ऊर्जा मिळाल्याचा संचार झाला. ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्यासाठी भव्यदिव्य असा तीन मजली मंच आणि प्रत्यक्ष हत्ती, घोडे, बैलगाडी आणि २०० कलाकारांचा संच असणार आहे. स्वतः खासदार डॉ. कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असतील. स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठान तथा जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी माजी सरपंच प्रकाश पाटील मिसाळ, अनिल मिसाळ, सागर मातकर, सागर पाटील, विजय भालेराव, दयानंद फुलारे, जगन्नाथ काळे मामा, गोरख गावंडे, प्रदीप आबा पाटील, कामाजी डक, गणपतराव म्हस्के आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...