आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सत्तारांना अधिकार नाही, त्यांचे बोलणे गांभीर्याने घ्यायचे नसते : खैरे; सेनेत नेते 13 की 15 माहीत नाही, माझा एकच नेता : सत्तार

औरंगाबाद / महेश जोशीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेना-भाजप युतीच्या ‘पुला’वरून खैरे-सत्तार यांच्यात दरी

‘शिवसेना-भाजपमधील “पूल’ ‌नितीन गडकरीच बांधू शकतात,’ या राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या खळबळ उडवून देणाऱ्या विधानावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे संतप्त झाले आहेत. शिवसेना शिस्तीचा पक्ष असून धोरणात्मक विषयांवर कधी, कोठे, काय बोलायचे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतात. त्याप्रमाणे इतरांना बोलावे लागते. सत्तार यांना धोरणात्मक मुद्द्यांवर बोलण्याचे अधिकार नसल्याचे खैरे यांनी म्हटले आहे. तर ‘शिवसेनेत उद्धव ठाकरे आपला एकच नेता असून आपल्याला पक्षाकडून तशी सवलत आहे,’ असा दावा सत्तार यांनी केला. ‘गडकरी पुला’च्या बांधणीबाबत दोन नेत्यांशी ‘दिव्य मराठी’ने साधलेला हा संवाद...

सत्तारांना अधिकार नाही, त्यांचे बोलणे गांभीर्याने घ्यायचे नसते - चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते
प्रश्न : ‘शिवसेना नेते’ हे पद तुमच्या पक्षात आमदार, मंत्र्यापेक्षा मोठे मानले जायचे.
​​​​​​​खैरे :
अगदी खरं आहे. शिवसेनेत आम्ही १३ नेते आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर पक्षात आमचेच स्थान सर्वाेच्च आहे. आमदार-मंत्री वगैरेला पक्षात तितके महत्त्व नाही.

प्रश्न : पण गेल्या काही दिवसांत पक्षात नेत्यांचे महत्त्व कमी होत आहे का?
खैरे :
(प्रतिप्रश्न करून -‘अशी कोठे बातमी आली का?), मग म्हणाले, सत्तारांसारखे कोणीच बोलत नाही. पण याचा अर्थ ‘नेत्यां’चे महत्त्व कमी झालेले नाही. बाळासाहेबांपासून नेतेपदाला महत्त्व हाेते अन‌् आजही आहे.

प्रश्न : तुम्ही सत्तारांना जाब विचारला का?
खैरे :
मी कशाला जाब विचारू? त्यात ते राज्यमंत्री आहेत. राज्यमंत्री असणे महत्त्वाचेे नाही. पण विषय नाजूक असल्याने उद्धव ठाकरेच संजय राऊतांमार्फत त्यांना बोलतील. पक्षप्रमुखांना सध्या बरे नसल्याने मी ‘मातोश्री’वरही याबाबत बोललेलो नाही.

प्रश्न : सत्तार हे शिवसेनेत ‘भाजपने पेरलेले नेते’ असल्याचे बाेलले जाते?
खैरे :
सिल्लोडची विधानसभेची जागा युतीत भाजपकडे होती. परंतु तेथे भाजप त्यांना स्वीकारायला तयार नव्हती. म्हणून त्यांनी आमच्याकडे पाठवले. सत्तारांचे रावसाहेब दानवे व भाजपच्या काही लोकांशी लागेबांधे आहेत. एकमेकांना मदत करण्यासाठी पूर्वीपासून ‘अंडरस्टँडिंग’ आहे. राजकारणात कुणावर भरोसा ठेवावा सांगता येत नाही.

प्रश्न : सत्तारांविषयी मराठवाड्यातील नेते म्हणून तुमच्याऐवजी खा. राऊत का बाेलले?
खैरे :
तसे नाही. राऊत मुख्य प्रवक्ता असल्याने त्यांना कसलेही बंधन नाही. ते काहीही बोलू शकतात. मला पुन्हा दिल्लीला पाठवण्याबाबत मागे त्यांनीच जाहीर वक्तव्य केले होते. यामुळे मुंबईत बसून काड्या करणाऱ्या एका प्रमुखाला मिरची लागली होती. राऊत जे बोलतात ते उद्धव ठाकरे बोलतात, असा अर्थ असतो.

प्रश्न : मुख्यमंत्री, पक्षप्रमुख बदलण्याबाबतही सत्तार बोलले आहेत.
खैरे :
सत्तारांच्या बोलण्याचा काहीच अर्थ नाही. ते ऊठसूट काहीही बोलतात. त्याला गांभीर्याने घ्यायचे नसते. अशा विषयांवर जे बाेलायचे ते उद्धव ठाकरे बोलतील आणि संजय राऊत सांगतील.

प्रश्न : शहरात दोन मंत्री असताना बाहेरचा पालकमंत्री कशामुळे?
खैरे :
१९९५ मध्ये मी कॅबिनेट व संपूर्ण पाच वर्षे पालकमंत्री होतो. मी शहरातला होतो, म्हणून मला पालकमंत्री केले. सध्याचे ‘दाेघे’ शहरातले नाहीत. शिवाय औरंगाबाद मराठवाड्याचे केंद्र आहे. औद्योगिक शहर असल्याने उद्योगमंत्र्यांना पालकमंत्री केले. मीच तशी मागणी केली होती. देसाई ज्येष्ठ व अभ्यासू आहेत. पक्षप्रमुख मंत्र्यांची क्षमता पाहून कोणाला पालकमंत्री करायचे ते ठरवत असतात.

सेनेत नेते १३ की १५ माहीत नाही, माझा एकच नेता, उद्धव ठाकरे - राज्यमंत्री अब्दुल सत्तार
​​​​​​​प्रश्न : तुम्ही आणि भुमरे दोन मंत्री असताना शहराचा पालकमंत्री मुंबईचाच कशामुळे होतो? यापूर्वी खैरे ५ वर्षे पालकमंत्री होते.सत्तार :
खैरे पालकमंत्री होते की नाही माहिती नाही. पालकमंत्री काेणाला करायचे याचा निर्णय पक्षप्रमुख घेतात. तेच ठरवतात. खैरेंना पुन्हा मंत्री करायचे की भुमरेंना पालकमंत्री करायचे. मी ठरवू शकत नाही.

प्रश्न : दिल्लीत गडकरींची भेट नेमकी कशासाठी घेतली?
सत्तार :
नितीन गडकरी माझे जुने मित्र आहेत. विधान परिषदेत आम्ही सहा वर्षे सोबत काम केले आहे. औरंगाबाद-जळगाव रोडच्या कामाला गती मिळावी, काही उणिवा दूर व्हाव्यात म्हणून मी दिल्लीत त्यांच्याकडे गेलो होतो. रावसाहेब दानवेंसोबतही रेल्वेच्या प्रश्नावर चर्चा केली.

प्रश्न : युतीचा पूल बांधण्याचा विषय कसा आला?
सत्तार :
युतीबाबत काही चर्चा झाली का? राज्याला रश्मी ठाकरे यांच्या रूपात पहिली महिला मुख्यमंंत्री मिळणार का? असे पत्रकारांनी विचारले. त्यावर मी एवढेच म्हणालो, हे तर चांगलेच आहे. राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री, तीही शिवसेनेची आणि त्यात रश्मी ठाकरे होणार असतील तर आम्हाला अानंदच होईल, असे मी म्हटले होते.

प्रश्न : उद्धव ठाकरे आजारी असल्याने राज्यात, पक्षात नेतृत्व बदलाच्या हालचाली आहेत?
सत्तार :
उद्धव ठाकरे ठणठणीत आहेत. व्हीसीच्या माध्यमातून ते सातत्याने आमच्याशी बोलतात. पक्षाच्या धोरणात्मक विषयांवर फक्त तेच बोलू शकतात. त्यांच्याशिवाय कोणाला अधिकार नाही.

प्रश्न : पण तुम्ही दिल्लीत तर बोललात ना?
सत्तार :
पत्रकारांच्या प्रश्नावर काही तरी बोलावेच लागते. मी काही अधिकृत प्रवक्ता, नेता नाही. माझे उत्तरही अधिकृत नव्हते. मला तसे बोलण्याचा अधिकार नाही. मी स्वत:हून काही नाही बोललो. जो प्रश्न विचारला, त्याचे उत्तर दिले. शिवाय गडकरी यांचे ‘मातोश्री’शी चांगले संबंध असल्याने युतीबाबत बोलण्याचा त्यांना अधिकार आहे. यामुळे मी असे म्हणालो.

प्रश्न : शिवसेनेत तुमची हळदही उतरलेली नाही, असे संजय राऊत म्हणालेत..!
सत्तार :
अगदी खरं आहे. पक्षात मी नवीनच आहे. अजून बरेच शिकायचे आहे. संजय राऊत यांची भाषा त्यांना आणि शिवसेनेला माहितीय. त्याबाबत मी काय बोलू? त्यांच्याबाबत टीका- टिप्पणी करणार नाही.

प्रश्न : शिवसेनेत १३ नेते असून, हे पद मंत्र्यापेक्षा मोठे मानले जाते. या नियमाने खैरे तुमचे नेते आहेत...
सत्तार
: (प्रश्न मध्येच कापत...) नेते १३ की १५ मला माहीत नाही. माझे एकच नेते आहेत, ते म्हणजे उद्धव ठाकरे. आणि पक्षात आपल्याला तेवढी सवलत आहे.

बातम्या आणखी आहेत...