आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:मेल्ट्राॅनमध्ये अनेक बेड रिकामे तरीही रुग्णांना ॲडमिट करण्यास टाळाटाळ

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
रुग्ण राधा इंगळे यांनी मेल्ट्राॅन हाॅस्पिटलमध्ये रिकामे असलेले बेड व्हिडिओतून दाखवले. - Divya Marathi
रुग्ण राधा इंगळे यांनी मेल्ट्राॅन हाॅस्पिटलमध्ये रिकामे असलेले बेड व्हिडिओतून दाखवले.
  • शुगर 550, श्वासाचा त्रास असलेल्या औरंगाबादच्या महिलेची व्यथा

काेराेनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वच रुग्णालये फुल्ल हाेत असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. प्रत्यक्षात बेड रिकामे असतानाही मनपाच्या मेल्ट्राॅन रुग्णालयात गरजू रुग्णांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. शुगर ५०० पर्यंत गेलेली, श्वास घेण्यास त्रास हाेत असतानाही पाॅझिटिव्ह महिलेला घरीच उपचार घेण्याचा सल्ला येथील डाॅक्टरांनी दिला. मात्र सदर महिलेने थेट खासदार डाॅ. भागवत कराड यांना फाेन केल्यानंतर तिला अॅडमिट करून घेण्यात आले. तिथे गेल्यावर तिनेच रिकामे बेड असल्याचा व्हिडिओ व्हायरल करून आराेग्य यंत्रणेचे पितळ उघडे पाडले.

चिकलठाणा येथील राधा इंगळे या महिलेने व्हिडिओद्वारे सत्य परिस्थिती समाेर आणली. ती सांगते, ‘माझी शुगर ५५० पर्यंत गेली आहे. सिटी स्कॅनमध्ये (एचआरसीटी) माझा स्काेअर ४ आल्याने मला काेराेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मला मेल्ट्राॅन रुग्णालयात दाखल हाेण्यास सांगण्यात आले. मी तिथे गेले. छातीत खूप दुखत असल्याचे सांगून तातडीने ॲडमिट करून घ्यावे अशी विनंती केली. मात्र एकही बेड रिकामा नसल्याचे कारण देत तेथील कर्मचाऱ्यांनी मला घरीच उपचार घेण्याचा सल्ला दिला. पण माझे घर खूपच छाेटे आहे. घरात लहान लेकरं आहेत. त्यामुळे मी हाेम क्वाॅरंटाइन हाेऊ शकत नाही, असे सांगत विनवणी केली, पण त्यांनी एेकले नाही. अखेर मी खासदार डाॅ. भागवत कराड यांना फाेन करून अडचण सांगितली. त्यांनी मेल्ट्राॅन रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली मुदगडकर यांना फाेन केल्यानंतर मला अॅडमिट करून घेण्यात आले.

प्रत्यक्षात जेव्हा मी काेविड वाॅर्डात आले तेव्हा तिथे बरेच बेड रिकामे दिसत हाेते. एकीकडे सामान्य रुग्णांना अॅडमिट करून घेण्यास नकार देणारे येथील डाॅक्टर व कर्मचारी आपल्या ओळखीच्या लाेकांसाठी हे बेड राखून तर ठेवत नाहीत ना?’ अशी शंका इंगळे यांनी व्यक्त केली. या वाॅर्डातील रिकामे बेडही त्यांनी व्हिडिओ शुटींग करून सर्वांना दाखवले. या प्रकरणी ‘दिव्य मराठी’ने मेल्ट्राॅनचे सीईओ नंदकुमार भाेंबे यांना फाेन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

डाॅक्टर माझेही एेकत नव्हते : खासदार डाॅ. कराड
या व्हिडिओची सत्यता पडताळून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने खासदार डाॅ. कराड यांच्याकडे विचारणा केली. ते म्हणाले, ‘महिलेचा मला फाेन आला हाेता. त्यानंतर मी मेल्ट्राॅनमध्ये फाेन करून अॅडमिट करण्यास सांगितले. मात्र तेथील डाॅक्टर माझेही एेकत नव्हते. जेव्हा मी मनपा प्रशासक व जिल्हाधिकाऱ्यांना फाेन करून तक्रार करताे, असे सांगितले त्यानंतर डाॅ. वैशाली यांनी सदर महिलेस अॅडमिट करून घेतले.’

ॲपवर खाटा फुल्ल
काेराेना रुग्णांना खाटांची अपडेट माहिती मिळावी यासाठी मनपाने ‘एमएचएमएच’ अॅपमध्ये साेय केली आहे. त्यानुसार रविवारी सायंकाळी ६ च्या नाेंदीनुसार मेल्ट्राॅन रुग्णालयातील सर्वच्या सर्व ३१९ बेड फुल्ल असल्याचे दाखवले आहे. प्रत्यक्षात या रुग्णालयातून राधा इंगळेंनी दाखवलेल्या व्हिडिआेत एका वाॅर्डातील दाेन्ही बाजूचे अनेक बेड रिकामे असल्याचे वास्तव दिसत आहे.

मराठवाड्यात ४०४५ नवे कोरोनाबाधित, ३१ मृत्यू; विदर्भात ६४ मृत्यू, ६९०६ रुग्ण
औरंगाबाद | मराठवाड्यात रविवारी ४०४५ रुग्ण सापडले, तर ३१ मृत्यू झाले. १९४२ बरे झाले. विभागात २३ हजार २३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. औरंगाबादेत १४३२, जालना ५३७, परभणी २२१, हिंगोली ७०, नांदेड ९२७, लातूर ३७७, उस्मानाबाद ११८, बीड ३६३ रुग्ण सापडले, तर औरंगाबादेत ११, नांदेड ९, जालना ४, परभणी-लातूरमध्ये प्रत्येकी २ व हिंगोली, उस्मानाबाद, बीडमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

विदर्भात ६४ मृत्यू. ६९०६ नवे रुग्ण. नागपूर-३२, वर्धा ७, तर चंद्रपूर २, भंडारा १, यवतमाळ १४, अमरावती ६, बुलडाणा-वाशीम प्रत्येकी १ मृत्यू. नागपूर विभागात ४४४८, तर अमरावती विभागात २४५८ नवे रुग्ण.

बातम्या आणखी आहेत...