आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात कडेकोट बंदोबस्त:मशिदींमध्ये कमी आवाजात अजान; कुठेच हनुमान चालिसाचे पठण नाही भोंग्यांमुळे त्रास होत असल्याच्या तक्रारींचे कार्यकर्त्यांनी चार ठाण्यांना दिले निवेदन

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेत मशिदींवरील भोंग्याच्या विरोधात आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सर्वांच्या नजरा शहरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लागल्या होत्या. पोलिसांनी कारवाईच्या नोटिसा बजावल्यानंतर ते कोणत्या मशिदीसमोर हनुमान चालिसाचा भोंगा वाजवणार याविषयी उलटसुलट चर्चा होती. मात्र, बुधवारी (४ मे) सकाळी अनेक मशिदींमध्ये नेहमीच्या आवाजात अजान झालीच नाही, असे या पदाधिकाऱ्यांना कळाले. त्यामुळे त्यांनी कुठेही पठण केले नाही. मौलवींनी असा दावा केला की, एकूण परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही अनेक मशिदींमध्ये कमी आवाजात अजान दिली.

मौलवींच्या दाव्याविषयी पोलिसांकडे विचारणा केली असता अशी माहिती समोर आली की, स्थानिक पोलिसांनी अजानच्या आवाजाचे डेसिबल मोजले नाही. दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार ५ मेपासून तीन दिवस शहरातील पाच भागांमध्ये भोंग्याविरुद्ध स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार आहे. याशिवाय भोंग्यांमुळे सामान्यांना त्रास होत असल्याचे तक्रारवजा निवेदन मनसेतर्फे चार पोलिस ठाण्यांना देण्यात आले.

ठाकरे यांच्या भोंग्याविरुद्ध पहिल्या इशाऱ्यानंतर औरंगाबादेत सभा झाल्याने सर्वांच्या नजरा औरंगाबादकडे लागल्या होत्या. अनुचित प्रकार घडण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी बुधवारसाठी जय्यत तयारी केली होती. सकाळपासूनच महत्त्वाच्या ४२ मशिदींसह ८० संवेदनशील ठिकाणी शस्त्रधारी जवानांसह पथक तैनात करण्यात आले. हिंदू-मुस्लिमांची घरे परस्परांपासून बऱ्यापैकी जवळ असलेल्या भागात पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती.

सातत्याने मौलवींशी संपर्कात : शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकारी मागील आठ दिवसांपासून मौलवींच्या संपर्कात होते. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश उलगडून सांगण्याबरोबरच आवाजाच्या मर्यादेविषयीही त्यांना समजून सांगण्यात आले. त्यानंतर शहरातील बहुतांश मशिदींचा आवाज कमी झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. काही संवेदनशील परिसरातील मंदिराच्या प्रमुखांनाही मनसेला कुठल्याही प्रकारचे गाणे वाजवू देऊ नका, असा निरोप देण्यात आला होता. त्याचा योग्य परिणाम झाला, असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या दप्तरी रेकॉर्डचा भाग म्हणून कोणत्या मशिदीतून किती आवाजात अजान देण्यात आली याची मोजणी स्थानिक पोलिस करतील, अशी चर्चा होती. मात्र, तसे घडले नाही. पोलिसांनी कुठेही अजानचे डेसिबल मोजले नाही.

काही होणार नाही याचा अंदाज होताच, तरीही खबरदारी आणि सातत्याने संवाद

वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर पोलिसांच्या अंतर्गत विभागांसोबतच इतर विविध गुप्तचर यंत्रणा बुधवारच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाल्या होत्या. रविवारच्या सभेनंतर माहिती गोळा करण्याच्या प्रक्रियेने वेग पकडला. विविध धार्मिक स्थळांचे प्रमुख, पुढारी, नेते, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. शिवाय त्यांच्याशी संवाद साधण्यात येत होता. मनसेला आंदोलनापासून रोखण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे, पण तरीही काही घडलेच तर तुमच्या बाजूने पूर्ण शांतता पाळा, अशी खास सूचना करण्यात आली. मनसे पदाधिकाऱ्यांना मंगळवारी दुपारीच नोटिसा पाठवून तंबीही देण्यात आली. त्यानंतर बुधवारी सायंकाळपर्यंत अनुचित प्रकार घडणार नाही याचा काहीसा अंदाज पोलिस व गुप्तचर यंत्रणांना आला होता तरीही खबरदारीचा उपाय म्हणून सकाळपासूनच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या घराबाहेर पोलिसांच्या गाड्या चकरा मारत होत्या. काहींच्या हालचालींवर ते लक्ष ठेवून होते.

कोर्टाच्या निर्णयाचा आदर : मौलाना
टीम दिव्य मराठीने उस्मानपुरा, शहानूरवाडी, पैठण गेट, शहागंज, रोशन गेट, जटवाडा आदी भागांतील मशिदीतून दिली जाणारी अजान ऐकली. दुपारी, सायंकाळी लाऊडस्पीकरचा वापर झाल्याचे दिले पण नेहमीपेक्षा कमी आवाज होता असे निदर्शनास आले. इमारत - ए - शरियाचे मराठवाडा उपाध्यक्ष, मौलाना डॉ. अब्दुल रशिद मदनी यांनी सांगितले की, न्यायालयाने भोंग्याच्या आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे. त्याचा आम्ही सन्मान करतो. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ठरवून दिलेल्या मर्यादेत अजान देणे सुरू केले आहे.

आवाज कमी झाल्याने आंदोलन नाही
बहुतांश मशिदींवरून सकाळी नेहमीप्रमाणे भोंग्यातून आवाज आला नाही. जिथे भोंगे वाजले तिथे आवाज कमी होता. त्यामुळे हनुमान चालिसा पठण करण्याची गरज पडली नाही, असा दावा मनसेने केला. सकाळी नऊ वाजता मनसेच्या पदमपुरा येथील हनुमान मंदिरात मनसे कार्यकर्त्यांनी आरती केली. त्याशिवाय कुठेही आंदोलन केले नाही, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी दिली. त्यांच्या उस्मानपुरा कार्यालयासमोर पोलिस बंदोबस्त होता. त्यांनी उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटींसोबत पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या.

बातम्या आणखी आहेत...