आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आझाद चषक टी-20 स्पर्धा:गुल्लू रेंजर्सने डी इलेव्हनला हरवले, माजेद खान ठरला सामनावीर

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लकी क्रिकेट अकादमीतर्फे आयोजित आझाद चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत गुल्लू रेंजर्स संघाने शनिवारी विजय मिळवला. नवल टाटा स्टेडियमवर झालेल्या लढतीत गुल्लूने डी इलेव्हन संघावर 13 धावांनी मात केली. या सामन्यात माजेद खान सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुल्लूने 20 षटकांत 8 बाद 133 धावा उभारल्या. यात संघाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर जोडी मधुर पटेल (1) व कर्णधार गुल्लू (0) आल्यापावली परतले. यष्टिरक्षक शोएब अहमद सिद्दीकीने 33 चेंडूंत 2 चौकारांसह 19 धावा केल्या. तौसिफ अहमदने 18 धावा जोडल्या. जुनैद पटेलने 10 चेंडूंत 1 चौकार व 2 षटकार खेचत 19 धावा ठोकल्या. अरिझ अद्राबीने 15 चेंडूंत 1 षटकारासह 15 धावा केल्या. फिरदी 11 धावांवर नाबाद राहिला. तळातील अष्टपैलू खेळाडू माजेद खानने फटकेबाजी करत 16 चेंडूंत 4 उत्तुंग षटकार खेचत सर्वाधिक 30 धावांची खेळी केली. त्याला परेश जोहरेने बाद केले. डी इलेव्हनकडून बळीराम तुपेने 24 धावा देत 3 गडी बाद केले. परेश जोहरेने 2 आणि अनिल थोरे व युवराज चव्हाणने प्रत्येकी एक एक गडी टिपला.

माजेदची अष्टपैलू कामगिरी

प्रत्युत्तरात डी इलेव्हन संघाचा डाव 19.5 षटकांत 120 धावांवर संपुष्टात आला. माजेद खानच्या अष्टपैलू कामगिरीमुळे गुल्लू संघाने विजय मिळवला. प्रथम फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर भेदक गोलंदाजी करत माजेदने डी इलेव्हनच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. युवराज चव्हाण (5), निलेश गवई (1), सौरभ राठोड (7), परेश जोहरे (6) हे फलंदाज अपयशी ठरले. सलामीवीर आकाश अभंगने 30 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकार खेचत सर्वाधिक 35 धावा केल्या. कृष्णा शिंदेने 18 व राहुल वाघने 17 धावांचे योगदान दिले. गुल्लूकडून अरिझ अद्राबी व गुल्लूने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

बातम्या आणखी आहेत...