आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्ट्रायकर संघांचा पराभव:खासदार चषक क्रिकेट स्पर्धेत बाबा बिल्डर्स, एम्पायर्स स्टेट, गुड्डू ईएमआय संघ विजयी

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदार इम्तियाज जलील यांच्या दुवा फाउंडेशनतर्फे आयजे क्रीडा महोत्सवांतर्गत आयोजित खासदार चषक स्पर्धेत क्रिकेट मंगळवारी बाबा बिल्डर्स व एम्पायर्स स्टेट संघांनी शानदार विजय मिळवला. आमखास मैदानावर झालेल्या सामन्यात बाबा संघाने एमआयटी क्युस्ट एक्सलन्स संघावर २६ धावांनी मात केली. अष्टपैलू विनायक भोईर (नाबाद ७७ धावा , २ बळी) सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. बाबा संघाने १५ षटकांत ३ बाद १७८ धावा केल्या. सलामीवीर आकाश बोर्डेने १६ धावा केल्या. कर्णधार सलमान अहमदने २४ चेंडूंत २ चौकार व २ षटकार लगावत ३० धावा काढल्या. आकाश व सलमान जोडीने ४५ धावांची सलामी दिली.

त्यानंतर आलेल्या कय्युमने फटकेबाजी करत १६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार मारत नाबाद ४१ धावा कुटल्या. आदित्य राजहंस १० धावा करून परतला. पाचव्या क्रमांकावर आलेल्या विनायक भोईरने अर्धशतकी खेळी करत संघाचा धावफलक वेगाने हलता ठेवला. त्याने २७ चेंडूंचा सामना करताना ४ चौकार आणि ७ उत्तुंग षटकारांची बरसात करत ७७ धावा ठोकल्या. कय्युम व विनायकने पाचव्या गड्यासाठी ९८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. एमआयटीच्या राजू ताकवाले, राजू परचक्के आणि अष्टपैलू वैभव चौगुले यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

वैभवचे अर्धशतक ठरले व्यर्थ
प्रत्युत्तरात एमआयटी संघ निर्धारित षटकांत ८ बाद १५२ धावा करू शकला. सलामीवीर सतीश भुंगजे भोपळाही फोडू शकला नाही. दुसरा सलामीवीर तथा कर्णधार शशिकांत पवार अवघ्या ४ धावांवर आल्या पावली तंबूत परतला. धीरज थोरतही (१३) मोठी खेळी करू शकला नाही. चौथ्या क्रमांकावर आलेल्या अष्टपैलू वैभव चौगुलेेचे अर्धशतक व्यर्थ ठरले. त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. वैभवने ३८ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार व ७ षटकार खेचत नाबाद ८० धावांची खेळी केली. अनुभवी खेळाडू ईशांत रायही अवघ्या ६ धावांवर परतला. अमित टाकने १५ धावांचे योगदान दिले. बाबाकडून अब्दुल समी व शेख अल्ताफने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

कर्णधार शेख मुकीमची अर्धशतकी खेळी
दुसऱ्या सामन्यात एम्पायर्स संघाने सान्या युनायटेड संघावर ९ गड्यांनी मात केली. प्रथम खेळताना सान्याने १५ षटकांत ६ बाद १०७ धावा काढल्या. यात राहुल शर्माने २३, सोहल मुसाने २१, नितीन फुलानेने २१ धावा केल्या. प्रत्युत्तरात एम्पायर्सने १३.३ षटकांत १ गडी गमावत विजय साकारला. कर्णधार शेख मुकीमने ४८ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ७० धावांची विजयी खेळी केली. ऋषिकेश पवार १२ धावांवर नाबाद राहिला. शेख मुकिम सामनावीर ठरला.

गुड्डू ईएमआय संघाचा शेख यासेर सामनावीर
तिसऱ्या सामन्यात गुड्डू इएमआय २१ संघाने आयकॉन हॉस्पिटल स्ट्रायकरवर ९ गड्यांनी विजय मिळवला. आयकॉनने १५ षटकांत ९ बाद १०० धावा काढल्या. प्रत्युत्तरात गुड्डू संघाने १२.५ षटकांत १०१ धावा करत विजय मिळवला. या लढतीत नाबाद ५५ धावा करणारा शेख यासेर सामनावीर ठरला.

बातम्या आणखी आहेत...