आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपचे माजी मंत्री व परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी खालच्या पातळीवर भाषा वापरून वीज वितरण कंपनीच्या अभियंत्याला अर्वाच्च शिवीगाळ केली. गंभीर म्हणजे घोडे लावण्याची अन् धाडी टाकण्याचीही भाषा केली. आमदारांचे औरंगाबादेतील सातारा परिसरातील एका बंगल्याचे मीटर वीज वितरण कंपनीकडून काढून नेल्याने ते संतापले. त्यानंतर त्यानी धमक्यांवर धमक्या देत ''मी 30 वर्षांपासून आमदार आहे. एका मिनिटांत घरी पाठविल माज चढला का?'' अशा शब्दात अभियंत्याला सुनावले.
आमदार लोणीकरांची यासंबधीची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली असून त्यात त्यांनी आक्षेपार्ह विधाने करीत धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत आमदार लोणीकर यांनी ''तो आवाज माझा नाही'' असे स्पष्ट केले.
वीज मंडळाचे औरंगाबाद प्रदेशाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोंदावले यांनी स्पष्ट केले की, वीज बिलात तफावत असेल तर आम्ही स्वतः ग्राहकांना बोलावतो व निराकरण करतो, पण बील बरोबर असूनही भरायची इच्छा नसेल तर कठोर कारवाई होते. बबनराव लोणीकरांच्या बाबतीतील क्लिप समोर आली, आता बातमीही आली आहे. आमचे अधिकारी थोडे घाबरलेले आहेत. त्यांनाही आम्ही आत्मविश्वास देत आहोत. थोडेसे डिटेल्स आले आहेत अजून माहिती घेतल्यानंतर या प्रकरणी काय कारवाई करायची हे ठरवू. वीज मंडळाकडून फोन, एसएमएसद्वारेही नोटीस दिली जाते, ही लिगल सर्विस आहे. मीटर लोणीकर यांच्याच नावे आहे की आणखी कुणाच्या नावे आहे, एसएमएससाठी फोन क्रमांक दिलेला त्यांचाच आहे का? हेही आम्ही तपासत आहोत. त्यानंतर काय कारवाई करायची यावर निर्णय घेऊ असेही मंगेश गोंदावले यांनी दिव्य मराठीशी बोलताना स्पष्ट केले.
असा आहे सवांद..
आमदार बबनराव लोणीकर यांनी अभियंता दादासाहेब काळे यांना संपर्क करून ''सातारा परिसरात तुम्हीच आहात ना.. तुम्ही मीटर काढून नेलं का माझं?'' असा प्रश्न केला. त्यानंतर त्यांनी शिव्यांची लाखोली, धमक्या अन् अर्वाच्च शिवीगाळ सुरु केली.
काय म्हणाले लोणीकर
अरे नालायकांनो..आम्ही बील भरतो. मी औरंगाबादच्या बंगल्याचं दहा लाख रूपये बील भरलं. तुमच्यात दम असेल अन् हिंमत असेल तर झोपडपट्टीत जा लोक जे आकडे टाकतात त्यांच्याकडे जा. आम्ही पैसे भरतो. दोन मीटरचे दहा लाख रुपये भरले मी या वर्षांत अशी त्यांनी भाषा वापरली.
माज चढला का?
''एका मिनिटांत तुला घरी पाठविल. माज चढला का, पैसे आम्ही भरतो. ज्यांच्याकडे आकडे आहेत त्यांच्याकडे जा. नोटीस मला दिली का? मीटर का काढून नेता तुम्ही? तीस वर्षे आमदार आहे मी, मंत्री राहीलो. तुम्हाला अक्कल हवी आमचे मीटर नोटीस न देता साठ हजार रुपयांसाठी काढून नेता. मी पागल आहे का.. मीटर काढुन नेले म्हणून बोलत आहे अशी भाषाही आमदारांनी वापरली.
दलित वस्त्या, झोपडपट्ट्यात जा..आमदारांचे आक्षेपार्ह विधान
''अरे नालायकांनो (वीज मंडळांच्या अधिकाऱ्यांना उद्देशुन) झोपडपट्ट्या, दलित वस्त्या आहेत तिथे जात नाही. आमच्या वस्त्यांतील मीटर काढून नेता.'' यावर अभियंता म्हणाले , ''तीन लाख रुपये बील आहे. साहेब आम्ही मीटर जागीच आहे, ते काढून नेले नाही साहेब.. तुमच्या मुलाला भेटून गेलो.'' तेव्हा आमदार म्हणाले, ''पैसे भरतो आम्ही. तेथील मीटरचे मागच्या वर्षी पाच लाख रूपये भरले आम्ही. जे पैसे देतात त्यांच्या मानगुटीवर बसता का..पस्तीस वर्षे झाले राजकारणात आहे. आम्ही एक रुपयांची वीज चोरत नाही. जे चोरटे आहेत त्यांच्या मागे लागा ना..तुमच्यात हिंमत नाही. ते तुम्हाला मटन कापायच्या सत्तुरने तोडतील असे आक्षेपार्ह विधानही त्यांनी केले.
घोडे लावण्याची केली भाषा
आम्ही लोक प्रतिनिधी आहोत. मी माझ्या शेतीपंपाचे पैसे, जालना, परतूरचे पैसे भरतो. कुणाचेही पैसे डुबविले नाही. आम्ही तिथे राहत नाही तरीही पैसे भरले. निट वागा एवढीच सुचना आहे. काचेची बांगडी आहे. घोडे लावू शकतो. औरंगाबादचे मुख्य अभियंता माझ्याकडे सहायक अभियंता होते. सस्पेंड करू शकतो. तुम्हाला निट करू शकतो अशी धमकीही लोणीकरांनी दिली.
आयकर इनकम टॅक्सच्या धाडी टाकील.
''मीटर काढून नेलेले नाही. मी परवाही बंगल्यावर आलो होतो'' असे अभियंता म्हणताच यावर लोणीकर म्हणाले, ''तुमच्या नालायक लोकांनी मीटर काढून नेले असेल, राजाला दिवाळी काय माहित असणार? आम्ही पैसे भरणारे लोक आहोत. आमच्यावर सुड उगवु नका. आयकर इनकम टॅक्सच्या धाडी टाकील. तुम्ही कुठे पैसे कमावले, कुठे चोऱ्या केल्या माहित आहे. आम्ही तुमच्या कुंडल्या काढू. आमच्या नादी लागू नका. अशी धमकीही त्यांनी दिली.
जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्याला तीन तास कोंडलं होतं!
जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्याला तीन तास कोंडलं होतं हे लक्षात ठेव, तुला दाखवु का. ते खंदारे सुद्धा माझे मीटर नेऊ शकत नाही. उर्जामंत्रीसुद्धा माझे जवळचे नातेवाईक आहे. तीन लाखांच्या बीलांसाठी वीज मंडळाचे अधिकारी आले होते. आम्ही चोर नाही, आधी चोराला धरा. आम्ही सातारा परिसरात राहतो तेथे 50 टक्के आकडे आहे ते मी धरून दाखवितो. उद्या येतो अन् तुम्हाला मी आकडे दाखवतो. निट राहायचं. सौजन्याने राहा, आम्ही हलकट लोक नाही. तुम्ही आकड्यावाल्यांकडे जात नाही, सस्पेंड करुन टाकेल अशी ऑडीओ क्लिपनुसार धमकीही बबनराव लोणीकर यांनी दिल्याचे समोर आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.