आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन:स्तनपान कराच, कोरोनाबाधित आईच्या दुधातून बा‌‌ळाला मिळतात अँटिबॉडी, औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संशोधन

रोशनी शिंपी | औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गर्भवतीतील कोरोना विषाणूविषयी देशातील पहिलाच अभ्यास
  • प्रसूतीनंतर माता व बाळ १४ दिवस एकमेकांपासून दूर ठेवण्याची गरज नाही

कोरोनाबाधित आईने बाळाला दूध पाजल्याने बाळाला कोरोना होत नाही, तर या दुधातून कोरोनाच्या अँटीबॉडी बाळाला मिळतात असे औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) प्रसूती विभागाने केलेल्या संशोधनात अाढळले अाहे. गर्भ‌वतीतील कोरोना विषाणू या विषयावर देशातील अशा स्वरुपाचा हा पहिलाच अभ्यास आहे. कोरोनाबाधित आईमुळे बाळाला कोरोनाचा संसर्ग होत नाही, तसेच संसर्ग झालेल्या गर्भवतीचे सीझरच होते हा समजही चुकीचा असल्याचे या संशोधनात म्हटले आहे.

घाटीच्या प्रसूती विभाग, नवजात शिशू विभाग आणि मायक्रोबायोलॉजी विभागाने केलेले हे संशोधन ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायन्टिफिक रिसर्च’ने जुलै २०२० मध्ये प्रकाशित केले आहे. घाटीचे प्रसूती विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांच्या पुढाकाराने हा अभ्यास करण्यात आला. नवजात शिशू विभागाचे डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी बाळांची निरीक्षणे, अहवाल यामध्ये योगदान दिले. डॉ. गडप्पा यांनी सांगितले की, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात आंतरराष्ट्रीय संशोधनातील निष्कर्षांनुसार प्रसूतीनंतर आई व बा‌ळ १४ दिवसांसाठी दूर ठेवले जात होते. मात्र बाळासाठी पहिल्या २४ तासांतील मातेचे दूध अधिक उपयुक्त असते. त्यावरुन हे संशोधन करायचे सुचले. त्यानुसार घाटीत प्रसूतीसाठी आलेल्या ५३ महिलांची निवड करण्यात आली. यासाठी इथिकल समितीची परवानगी घेण्यात आली.

संशोधनातील निरीक्षणे

> गर्भवतीला कोरोना झाल्यास त्याचा परिणाम माता किंवा गर्भावर किंवा प्रसूतीच्या प्रक्रियेवर होत नाही.

> मातेमुळे बाळाला कोरोना संसर्ग होत नाही.

> कोरोनाबधित महिलेचे सिझेरियनच होते असे नव्हे तर सामान्य प्रसूती ही शक्य आहे. सिझेरियन नेहमीच्या इतर कारणांनी होऊ शकते.

> कोरोनाबाधित आईच्या दुधानेही बाळाला कोरोना होत नाही. उलट कोरोना होऊन गेलेल्या आईच्या दुधातून बाळात कोरोनाच्या अँटिबॉडी तयार होतात.

> कोरोना झालेल्या मातेने प्रसूतीनंतर बाळापासून १४ दिवस वेगळे राहण्याची गरज नाही. बाळ आणि माता यांनी सुरक्षित अंतर ठेवून राहायला हवे.

स्तनपानामुळे अनेक रोगांपासून संरक्षण

^बाधित मातेच्या दुधात १४ दिवसांनंतर कोरोनाच्या अँटिबॉडी दिसल्या आहेत. याची गुणवत्ता आणि आयुर्मान किती आहे, याबाबत संशोधन सुरू आहे. पहिल्या तीन दिवसांतील मातेचे दूध हे खरे तर पाहिले लसीकरणच आहे. दुधामुळे जीवाणू, विषाणूजन्य आजारांपासून संरक्षण होते. डायरिया, न्यूमोनिया, न्यूनेट सेपसिस(तोंडातील अल्सर) यापासून बाळाचे संरक्षण मिळते. दूध पाजताना तीन डब्ल्यू आवर्जून पाळले पाहिजेत. वॉश हँड, विअर मास्क आणि वॉश सर्फेस हे अत्यंत महत्त्वाचे आहे. - डॉ. श्रीनिवास गडाप्पा, प्रमुख, प्रसूती विभाग, शासकीय रुग्णालय औरंगाबाद.

बातम्या आणखी आहेत...