आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनरुज्जीवनचा उत्साह ओसरला:खाम नदीच्या इको पार्कमध्ये दुर्गंधी, पुढाऱ्यांचे नाव असलेले उद्यान बकाल

औरंगाबाद / मंदार जोशी20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘माझी वसुंधरा’ या प्रकल्पांतर्गत खाम नदी पुनरुज्जीवनचा प्रकल्प दोन वर्षांपूर्वी माेठा गाजावाजा करून हाती घेण्यात आला होता. वर्षभरापूर्वी छावणी परिसरात खाम नदीच्या काठावर इको पार्क तयार करण्यात आले. आता इको पार्कची दुरवस्था झाली आहे. नदीत नाल्याचे पाणी वाहत आहे. उद्यानात अर्धा तास बसणे म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याचे कारण सांगून हे उद्यान सामान्यांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. शनिवारी दिव्य मराठी प्रतिनिधीने पाहणी केली असता उद्यानाची बकाल अवस्था समाेर आली.

मनपा आणि स्मार्ट सिटीच्या वतीने तत्कालीन मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी हा उपक्रम हाती घेतला होता. उद्यानाकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे म्हणून या इको पार्कमधील छोट्या भागांना आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींची नावे देण्यात आली होती. उद्यानाच्या सुरुवातीलाच आमदार सतीश चव्हाण यांच्या नावाने सतीश नाना-नानी पार्क आहे. येथे झुडपे वाढल्यामुळे बसणे मुश्कील झाले आहे. पुढे गेले की अंबादास फुलपाखरू उद्यान होते. ती पाटी आता दिसेनाशी झाली आहे. त्याच्याच थोडे पुढे गेले की चंद्रकांत खैरे यांच्या नावाने चंद्रकांत योगा लॉन्स आहे. या लॉन्सवर योगा तर सोडाच, चालताही येत नाही.

सांडपाणी व्यवस्थापनाचा फज्जा : सध्याचे खाम नदीचे पाणी पूर्णपणे शेवाळलेले आणि दुर्गंधीयुक्त आहे. पाण्यात घाण वाहून येते. त्याचा वास दूरपर्यंत येतो. अनेक ठिकाणी गटारीचे पाणी खाम नदीत सोडल्याचे दिसते. सांडपाणी व्यवस्थापनाचा पूर्ण फज्जा उडाला आहे. पाणीटंचाईबाबत अजूनही कुठलेही ठोस निर्णय झालेले दिसत नाहीत. असे असताना हा फिक्कीचा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. औरंगाबाद छावणी परिषद, वररोक, इको सत्त्व व नागरिकांच्या सहभागातून खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला होता. यामध्ये पाच किलोमीटर नदीचे रुंदीकरण, खोलीकरण व पीचिंग केली. सोबतच नदी काठावर एक लाखापेक्षा जास्त झाडे लावण्यात आल्याचा दावा मनपाने केला होता.

आदित्य सराेवरात कमळ फुलले तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाने आदित्य सरोवर आहे. यात चांगले कमळ फुललेले आहेत. मात्र दुर्गंधी आणि शेवाळामुळे येथे थांबणे शक्य नाही. आमदार विक्रम काळे यांच्या नावाने विक्रम प्रदर्शनी ही जागा आहे. येथे कसेबसे पोहोचता येते. रस्ता उखडला आहे, दगडांचा ढीगच पाटीसमोर आहे. शनिवारी या ठिकाणी पाहणी केली तेव्हा एक भला मोठा साप निघाला. गवत काढणाऱ्या एका महिलेच्या जवळून तो पुढे गेला.

उन्नती तलावाला झुडपाचा वेढा आदित्य सरोवराच्या समोरच छोटासा भागवत कमल तलाव आहे. या तलावातील पाणी पाहण्यासाठी झुडपातून कसाबसा रस्ता शाेधावा लागतो. आत पाहिले तर कमळ दिसतच नाही, दिसते फक्त शेवाळ. त्याच्या बाजूच्या इम्तियाज सूर्यकुंडातील शेवाळ आणि खाम नदीच्या दुर्गंधीमुळे येथे थांबणे शक्य नाही. आतापर्यंत झालेल्या महिला महापौरांच्या नावाने उन्नती तलावाला झुडपांनी वेढले आहे. त्यामुळे इथपर्यंत जाताच येत नाही.

तरीही फिक्की संस्थेने जाहीर केला पुरस्कार खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प व सांडपाणी व्यवस्थापनासाठी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) या संस्थेने स्पेशल ज्युरी अवॉर्ड जाहीर झाला आहे. नदी स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, उन्हाळ्यात पाणीटंचाई लक्षात घेऊन घेतलेले निर्णय व विविध उपक्रमासाठी महापालिकेला हा पुरस्कार देण्यात यतो. यासाठी पाच टप्प्यांची चाचणी घेण्यात येते. सर्व चाचण्यात मनपा यशस्वी झाल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. २३ नोव्हेंबरला एका कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

पार्क नागरिकांसाठी खुले खाम नदीतील इको पार्क नागरिकांसाठी खुला आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी उद्यान सुरू असते. काही प्रमाणात नदीची दुर्गंधी येते. मात्र ती थांबावी यासाठीसुद्धा नियोजन सुरू आहे. नागरिकांना एक चांगले उद्यान मिळावे म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. - विजय पाटील, उद्यान निरीक्षक, मनपा

बातम्या आणखी आहेत...