आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मनपा प्रशासनाकडून निर्णय घेण्यात येत नसल्याने या भूमिकेविरोधात बहुजन कामगार शक्ती महासंघातर्फे २३ जून रोजी दुपारी १२.३० वाजता पैठण गेट ते मनपा मुख्यालयादरम्यान घंटा नाद तसेच झाडू मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय रगडे यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी २१ जून रोजी पत्रकार परिषदेत घेतली. त्यात ते म्हणाले की,मनपा आकृतिबंद आराखड्यामध्ये पाच हजार सफाई कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.
त्यात प्राधान्याने त्यांच्या वारसांना सामावून घ्यावे, मनपा सेवा भरती नियमानुसार सर्वांनाच लाड समितीचे फायदे द्यावे, मुंढे चौकशीतील सफाई कामगारांना तत्काळ वेतनवाढ, वेतन भत्ते व सेवाविषयक लाभ द्यावे, सिडको-हडकोत २० वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या ३५० कर्मचाऱ्यांना विनाअट सेवेत सामावून घ्यावे, वर्ग ४ मधील सफाई कर्मचाऱ्यांना व इतर कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी द्यावी, अनुकंपा-लाड समितीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावी, नोव्हेंबर २०१५ नंतर नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, स्वच्छता निरीक्षकांना २५०० रुपये वाहन भत्ता मिळतो, तर स्वच्छता जवान यांना केवळ ४०० रुपये वेतन भत्ता मिळतो. हा भत्ता २५०० रुपये करावा यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे रगडे म्हणाले. यावेळी महासंघाचे अध्यक्ष अशोक हिवराळे, सचिव कैलास जाधव, कार्याध्यक्ष संतोष खरात यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.