आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबादच्या पुंडलिकनगरात राहणाऱ्या एका लहानग्याने “सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमातून देशभरातील रसिकांना भुरळ घातली. यास आता काही काळ लोटला. पण, लहानग्या हर्षलची क्रेझ रसिकांत कमी झालेली नाही. पुण्यात तो दिसला की लोक सेल्फीसाठी गर्दी करतात. लोकप्रियतेचे शिखर गाठल्यावरही त्याच्यातील साधेपणा कायम आहे. चंदेरी दुनियेत गेल्यावरही त्याचे निरागस बालपण हरवू दिले नाही. कारण हे यश म्हणजे आयुष्य नाही, अशा शब्दांत त्याचे वडील अंगद नायबळ यांनी भावना व्यक्त केल्या.
वयाच्या पाचव्याच वर्षी “सूर नवा ध्यास नवा’ या रिॲलिटी शोमध्ये सूत्रसंचालन आणि गाण्यातून हर्षलने लक्ष वेधले होते. बालदिनानिमित्त या हरहुन्नरी मुलाचा प्रवास दिव्य मराठीने जाणून घेतला. पुंडलिकनगरच्या गल्ली नंबर १० मधील घराच्या गॅलरीत हर्षल उभा होता. मी आले म्हणून तो खाली आला. ‘घर वरती आहे..’ असे म्हणत पुढे चालू लागला. ‘तुम्ही पत्रकार आहात ना? माझी मुलाखत घ्यायला आला आहात ना?’ असे प्रश्न त्याने विचारले. मी पत्रकारांना पाहिले आहे. “मांझी’ सिनेमात होता ना. ‘पत्रकार हो तो खुद का अखबार काहे नाहीं खोलते? क्या अखबार खोलना पहाड उठाने से बडा काम है क्या?’ असा संपूर्ण संवादच त्याने एका दमात म्हणून दाखवला. नायबळ म्हणाले, हर्षल अडीच-तीन वर्षांचा असताना त्याला गाणी आवडतात हे आमच्या लक्षात आले.
आम्ही “कट्यार काळजात घुसली’ सिनेमा पाहण्यास गेलो. तेव्हा गाणी लागली की तो एकरूप व्हायचा. पण संवाद सुरू असेल की बोअर व्हायचा. जेव्हा सिनेमा संपला तेव्हा तो “अरुणी किरणी…’ हे गाणे बाहेर पडताना म्हणत होता. तेव्हा चित्रपटगृहाबाहेर पडत असलेले प्रेक्षक अवाक् झाले. इतका लहान मुलगा कसे काय हे गाणे म्हणतोय म्हणून सगळेच थक्क झाले. मी झालो. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ सिनेमातील पोवाडा तर तो अभिनयासह म्हणून दाखवायचा. मी सहज एका ऑडिशनला त्याला घेऊन गेलो. तिथे तोच पोवाडा एका मुलाने म्हटला. माझा पोवाडा त्याने का म्हटला म्हणून तो नाराज झाला. आम्ही तिथून निघून आलो. तो चांगला गातो म्हणून मी प्रयत्न केला. पण त्याने हेच करावे, असा माझा अट्टहास मुळीच नाही. फक्त एकदा चान्स घ्यावा वाटला. त्यानंतर कलर्स वाहिनीच्या “सूर नवा’चे ऑडिशन शिवछत्रपती महाविद्यालयात हाेणार हाेते. तिथे त्याला घेऊन गेलो. रांग खूप मोठी होती. शिवाय सहा वर्षांवरील मुलांनाच प्रवेश होता. हर्षलचा नंबर लागणार नाही, उगाच वेळ घालवू नका असे मला स्पष्ट सांगण्यात आले. पण तो लगेच म्हणाला, ‘अहो, मी गाणं म्हणायला आलोय, मला गाणं तर म्हणू द्या.’ मग सहज त्याला गाणे म्हणायची संधी मिळाली. सकाळी ९ पासून सायंकाळी ६ पर्यंत हा काही थांबणार नाही असे मला वाटत होते. ८ दिवसांनी फोन आला. त्याला स्पर्धेत घेणार नाही, पण कार्यक्रमाचा भाग बनवतो आहोत म्हणून. मग तो सहभागी झाला. त्यानंतर अनेक ऑफर आल्या. पण आम्हाला त्याची सहजता, निरागसता कायम ठेवायची आहे. त्याला वयापेक्षा आधी मोठे करायचे नाहीये. म्हणून कोणत्याही उद्घाटन सोहळ्याला किंवा सत्काराला आम्ही नकार देतो, असेही नायबळ सांगत होते.
क्रिकेटची आवड
मुलाखत घ्यायला पत्रकार येताहेत म्हणून हर्षल तयार झालेला होता. वडील गप्पा मारत असताना तो फुग्याशी खेळत होता. एकदाही फुगा खाली पडू दिला नाही. शिवाय ज्या क्षणी “सूर नवा’ची काही चर्चा व्हायची तेव्हा तो लगेच पूर्ण किस्सा सांगायचा. इतक्या वेगवेगळ्या ऑफर येत आहेत तर कोणत्या करायच्या ठरल्या, याविषयी विचारल्यावर त्याचे वडील म्हणाले, त्याला क्रिकेटची आवड आहे. त्याने गायन किंवा अभिनयच करावा असा आमचा आग्रह नाही. त्याला जे वाटेल ते करावे. ते फूल त्याच्या नैसर्गिक कलेने वाढावे इतकीच अपेक्षा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.