आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटयगृहात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने (26 जुलै) मंगळवारी 92 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कोरोनामुळे मागील तीन वर्षांपासून विद्यापीठ स्तरीय पुरस्कारांचे वितरण झाले नव्हते. उत्कृष्ट एकक, उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी, उत्कृष्ट स्वयंसेवक आणि उत्कृष्ट प्रशंसा पुरस्कार असे एकुण 92 पुरस्कारांचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
सोहळ्यानंतर पार पडली कार्यशाळा
कुलगुरूंनी पुरस्कार वितरण केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘कोरोना काळात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वसंसेवकांनी आणि कार्यक्रमाधिकाऱ्यांनी केलेल्या भरीव कामगिरीला तोड नाही. बदलत्या सामाजिक परिस्थितीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या उद्दिष्टांचे पुनश्च अवलोकन करुन नवीन मूल्यरचना करण्याची गरज आहे. ’ असेही त्यांनी म्हटले. यावेळी राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. शरद बोरुडे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे माजी संचालक डॉ. टी. आर. पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती. पुरस्कार वितरण सोहळयानंतर लगेचच कार्यक्रमाधिकाऱ्यांची कार्यशाळा पार पडली.
मान्यवरांची उपस्थिती
यात शरद बोरुडे यांनी डिजीलॉकर, व्टिटर हँडल विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. आनंद देशमुख यांनी केले होते. डॉ. देशमुख यांनी रासेयो विभागाचा आढावा सादर केला. या योजनेअंतर्गत होणाऱ्या विविध उपक्रमांचा विस्तृत अहवाल त्यांनी सादर केला. सूत्रसंचालन डॉ. समाधान इंगळे यांनी केले. प्रा.शर्मिष्ठा ठाकूर यांनी आभार मानले. या कार्यशाळेत विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील कार्यक्रमाधिकारी व स्वयंसेवक मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रा.से.यो विभाग कर्मचारी, गटसन्वयक जिल्हा समन्वयक यांनी सक्रिय सहभाग घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.