आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैज्ञानिक जाणीवा प्रगल्भ होणे गरजेचे:'आविष्कार’च्या पारितोषिक वितरण प्रसंगी कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोक ढवण यांचे प्रतिपादन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तरूणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात संशोधन व नवनिर्मितीला प्रचंड संधी आहे. यासाठी तरुण संशोधकांच्या वैज्ञानिक जाणीवा अधिक प्रगल्भ होणे गरजेचे आहे, असे मत परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु, तथा कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित ‘आविष्कार’ महोत्सवाचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ बुधवारी त्यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, संयोजक विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. मुस्तजीब खान, प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांची उपस्थिती होती.

’आविष्कार’मधील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. डॉ. ढवण म्हणाले, ‘तत्कालीन कुलपती एस. एम. कृष्णा यांनी १६ वर्षांपुर्वी तरुण संशोधकांसाठी ’आविष्कार’ची सुरुवात केली होती. या काळात अनेक संशोधक घडले आहेत. जागतिकीकरणानंतर अर्थव्यवस्था वेगाने बदलली तर आयटी क्रांतीनंतर ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक प्रचंड असून शिक्षकांनी देखील ’अपडेट’ राहिले पाहिजे. एकुण जीडीपीच्या किमान ६ टक्के खर्च संशोधनासाठी करण्याची गरज आहे.’ असेही त्यांनी म्हटले.

पूर्ण वेळ संशोधक हवे-कुलगुरू

पदवी अथवा नोकरी आणि संशोधना एवढी मर्यादित असता कामा नये. विदेशाप्रमाणे आपल्याकडेही पुर्णवेळ संशोधकांची आवश्यकता आहे, असे मत कुलगुरु डॉ. येवले यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केले. नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेला प्राधान्य असून विद्यार्थी केंद्रबिंदु ठेऊन अभ्यासक्रमाची रचना होत आहे. समाजपयोगी संशोधन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.डॉ. सुचेता एम्बल यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ. पराग हासे यांनी सूत्रसंचालन डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले. आविष्कारसाठी डॉ. राम चव्हाण, डॉ. सतीश भालशंकर, डॉ. विष्णु पाटील, डॉ. प्रशांत अंबड, डॉ. सुयोग अमृतराव, डॉ. राम कदम, डॉ. संदीप देशमुख आदींनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...