आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असली कसली पदवी परीक्षा:औरंगाबादमध्ये एका बाकावर तीन विद्यार्थी; हॉलतिकीट न देता तोंडी सांगितले आसन क्रमांक

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत घेण्यात येणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षांना 1 जूनपासून सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पुनर्रपरिक्षार्थींच्या पेपरमध्ये हॉलतिकीट आणि परीक्षा केंद्र यामुळे गोंधळ झाला होता. तोच प्रकार पुन्हा आज दुसऱ्या दिवशी नियमित विद्यार्थ्यांच्या पेपरमध्ये पाहण्यास मिळाला. आज दुसऱ्या दिवशी तर चक्क परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांना तोंडी आसन क्रमांक सांगण्यात आला. विशेष म्हणजे एका बाकावर तीन-तीन विद्यार्थी बसवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत हॉलतिकीट उपलब्ध न झाल्याने नेमके केंद्र कोणते म्हणून परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली.

बुधवारपासून परीक्षा सुरू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना बुधवारपासून सुरुवात झाली. यात पहिल्या दिवशी ज्या विद्यार्थ्यांचे विषय राहिले आहेत, अशा पुनर्रपरिक्षार्थींचा पेपर होता. तर आज 2 जूनपासून नियमित असणाऱ्या विद्यार्थ्यांचे पेपर सुरू झाले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून सर्व काही बंद होते. परीक्षाही ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात आल्याने यंदाही परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन यावर चर्चा झाली होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने परीक्षा ऑफलाइनच घेण्याचे ठरले.

हॉलतिकीट उशिरा पाठवले

चार जिल्ह्यातील 225 महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रांवर ही परीक्ष होत असून 1 लाख 99 हजार 35 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. पदवी वर्गतील पुर्नपरीक्षार्थी विद्यार्थीचा बुधवारी पेपर झाला. या पहिल्याच पेपरला परीक्षा विभागाचे ढिसाळ नियोजन दिसून आले . पुनर्रपरिक्षार्थींचे पेपर नेमके किती विद्यार्थी देणार हे निश्चित नव्हते. 30 आणि 31 मे रोजी दिलेल्या सूचनांमध्ये परीक्षा केंद्रात अतिरिक्त विद्यार्थी यामुळे बदल करण्यात आला. परंतु तो विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचलाच नाही. एकमेकांना विचारत केंद्रांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. तर काही विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट महाविद्यालयांच्या लॉगिनला उशिराने पाठविण्यात आले.

संचालक म्हणतात, तक्रार नाही

मात्र, गुरुवारी असलेल्या परिक्षार्थींचे हॉलतिकीट त्यांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध झालेच नाहीत. अल्फाबेट प्रमाणे केंद्र असल्याने परीक्षा केंद्रावर पोहचलेल्या विद्यार्थ्यांना तोंड आसन क्रमांक सांगितल्याने विद्यार्थ्यांनी प्रश्न केला असता तुमची तक्रार करण्यात येईल, असा दम विद्यार्थ्यांना शेंद्रा येथील केंद्रात देण्यात आला, तर अनेक केंद्रावर अतिरिक्त विद्यार्थी दिल्याने महाविद्यालयांची अडचण झाली. दरम्यान, या संदर्भात विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांना विचारले असता आमच्याकडे अशी तक्रार आली नाही असे सांगण्यात आले.

हॉलतिकीट 30 आणि 31 मे रोजी देण्यात आले, पण ते डाउनलोड करताना अडचणी आल्या. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी या महाविद्यालयात कसे आले, याची चौकशी करून निर्णय घेऊ. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ.

- डॉ. गणेश मंझा, परीक्षा संचालक

बातम्या आणखी आहेत...