आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीवरून पुन्हा वादंग

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: शेखर मगर
  • कॉपी लिंक
  • छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून अधिसभा सदस्य विजय सुबुकडेंनी केले भूमिपूजन
  • कुलसचिव डॉ.सूर्यवंशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागवला खुलासा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणीवरून पुन्हा एकदा वादंग निर्माण झाले आहे. पुतळ्याच्या स्थापत्य कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (१२ मे) ठेकेदार अतुल निकम यांना कार्यादेश जारी केले. नंतर अधिसभा सदस्य विजय सुबुकडे यांनी बांधकाम विभागाच्या सहमतीने (१४ मे) वनस्पती उद्यानात भूमिपूजन केले. पण ‘भूमिपूजन कुणाला विचारून केले? याचा खुलासा करा’ असा जाब कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सा.बां.च्या कार्यकारी अभियंत्यांना विचारला आहे. दरम्यान, पुतळ्याच्या दिशेवरूनदेखील नवा वाद निर्माण केला जात आहे.

विद्यापीठात पुतळा बसवू अशी घोषणा तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केली. २०१७ मध्ये व्यवस्थापन परिषदेत प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाला. अर्थसंकल्पात पुतळ्यासाठी आधी ५०, त्यानंतरच्या वर्षात ५० लाख अशी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पुढे या पुतळ्याला काही जणांनी विरोध करत पुतळ्याऐवजी शिवाजी महाराजांच्या नावाने एक कोटीचे वसतिगृह उभारा अशी भूमिका घेतली. त्यावर वर्षभर आंदोलन, प्रति आंदोलन झाले. मग विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांची मंजुरी घेण्यात आली. व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्या अध्यक्षतेत एक समिती स्थापन झाली. अधिसभेनेही सुबुकडेंच्या अध्यक्षतेत समिती स्थापन केली. पुतळा मान्यतेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला. तेथे मंजुरीनंतर विद्यापीठ प्रशासनाने वनस्पतीशास्त्र विभागाच्या अंतर्गत असलेल्या बॉटनॅकिल गार्डनमध्ये पुतळा उभारणीचे काम सा.बां.कडे सोपवले. खुलताबादचे शिल्पकार नरेंद्र साळुंके सुमारे २०० किलोग्राम वजनाचा धातूचा पुतळा तयार करणार आहेत.

छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर (१४ मे) शुक्रवारी ठेकेदार निकम, सुबुकडेंनी कामाला सुरुवात केली. नारळ फोडून भूमिपूजन झाल्याचे सोशल मीडियावरून सांगण्यात आले होते. मात्र, सा. बां. विभागाने परस्पर भूमिपूजन कसे केले? याचा खुलासा करा, असे पत्र १७ मे रोजी डॉ. सूर्यवंंशी यांनी दिले आहे. दरम्यान, १४ रोजी भूमिपूजन झालेच नाही. पुतळ्याचा भार माती उचलू शकते की नाही? याच्या तपासणीसाठी नमुने घेण्यात आले. १५ रोजी नमुने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पाठवल्याचे सा.बां. विभागाने म्हटले आहे.

परस्परविरोधी दिशेने पुतळे बसवू नका : रिपाइं
दरम्यान, रिपाइंने (ए) नवा मुद्दा उपस्थित केला आहे. वाय पॉइंटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अगदी विरुद्ध महाराजांच्या पुतळ्याची दिशा करू नये, अशी मागणी युवक आघाडीचे नागराज गायकवाड यांनी निवेदनाद्वारे कुलगुरूंकडे केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची दिशा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीकडे केली जाणार आहे, तर बाबासाहेबांच्या पुतळ्याची दिशा विद्यापीठ प्रवेशद्वाराकडे आहे. दोन्ही महापुरुषांचे पुतळे एकमेकांकडे पाठ केलेले योग्य दिसणार नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रवेशद्वाराकडेच महाराजांच्या पुतळ्याची दिशा ठेवावी.

कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली
पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा दिमाखदार करण्याचा विचार आहे,पण कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. राज्य सरकारने सर्व कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे स्थापत्य कामाचे कार्यादेश जारी झाले असले तरीही तूर्त भूमिपूजन केले जाऊ शकत नाही. कोरोना नियंत्रणात आला की लवकरच सोहळा आयोजित करू. - डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

विद्यापीठ करत आहे दिरंगाई
विद्यापीठाने पुतळा उभारणीच्या कामात आधीच दिरंगाई केली आहे. मागील चार वर्षांपासून विविध प्राधिकरणांनी पुतळ्यासाठी मान्यता दिली आहे. राज्य सरकारची ना हरकत येऊन दोन वर्षे उटलली. विद्यापीठाने स्वत:हून पुतळ्यासाठी कधीही पाठपुरावा केला नाही. जेव्हा आम्ही आग्रह धरतो त्या वेळी कामच होऊ नये म्हणून आडकाठी घालण्याचे काम प्रशासन करत आहे. - विजय सुबुकडे, अधिसभा सदस्य

बातम्या आणखी आहेत...