आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जुन्या शहरात म्युझिक लायटिंग शोवर मंडळांचा भर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन वर्षांनंतर वेगवेगळे सामाजिक देखावे सादर करण्याचीही मंडळांकडून लगबग

दोन वर्षे कोरोनात कुठल्याही देखाव्याशिवाय गणेशोत्सव साजरा झाला. यंदा मात्र विघ्नहर्त्याने संकट दूर सारल्याने गणेशभक्तांत उत्साहाचे वातावरण आहे. राजाबाजार - बांबू मार्केट, गुलमंडी या भागासह शहरातील गणेश मंडळांकडून सामाजिक देखावे तयार करण्याची लगबग सुरू आहे. आता देखावे पाहण्याच्या निमित्ताने शहरातील रस्ते रात्री उशिरापर्यंत गजबजलेले पाहायला मिळतील.

१९७९ साली स्थापन झालेल्या गुलमंडी भागातील श्री अष्टविनायक गणेश मंडळाची चांदीच्या मूर्तीचे दरवर्षी आकर्षण असते. हा नवसाचा गणपती म्हणून मानला जातो. यंदा मुंबईहून आणलेल्या खास लायटिंग शोचे दहा दिवस आकर्षण राहणार आहे. तसेच गुलमंडीतील सव्वाशे वर्षे जुन्या ऐतिहासिक राम मंदिराच्या पुनर्निर्माणाचे भूमिपूजन केले जाणार आहे. यावर दहा कोटी खर्च केले जाणार आहेत. १९ फूट रुंद, १०० फूट लांब असे मंदिर दोन-अडीच वर्षांत उभारण्यात येईल, असे मंडळाचे अध्यक्ष योगेश शहा यांनी सांगितले.

गांधी पुतळा भागात ४० वर्षांपासून श्री नवसार्वजनिक गणेश मंडळ गणेश उत्सव साजरा करते. त्यांनी सामाजिक देखाव्यांची परंपरा सुरू केली. मंडळाने आजवर कठपुतळ्यांच्या सादरीकरण शंकर-शिव पार्वती नृत्य, अक्षरधाम मंदिर, श्रीकृष्ण जन्म अशा प्रकारचे देखावे उभारले होते. यंदा जम्मू-काश्मिरातून कलाकार येऊन शिव-पार्वतीच्या नृत्याचे आणि भक्तिगीतांवर नृत्याचे सादरीकरण करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष आनंद भारुका यांनी सांगितले.

तरुण भारत गणेश मंडळ उभारणार एलईडी वॉल : औरंगपुरा पार्किंगलगत ६४ वर्षांपासून तरुण भारत गणेश मंडळ गणेश उत्सव साजरा करते. यंदा पुण्याहून मागवलेली एलईडी वॉल उभारण्यात येणार आहे. तसेच रक्तदान शिबिर घेण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राखुंडे यांनी सांगितले.

गेल्या ३५ वर्षांपासून यादगार गणेश मंडळाने सजीव देखाव्याची परंपरा जपली आहे. सुरुवातीला खजुराहो मंदिर, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा देखावा, किल्लारीचा भूकंप, सर्कस, भोले की चली रे बारात, गणपतीची मिरवणूक, होळी, साईबाबा, ११ फुटी नृसिंह भगवान मूर्तीचा सजीव देखावा भक्तांना आकर्षित करणारे ठरले. यंदा गणेश मंडळामार्फत दहीहंडीचा देखावा, बांबू मार्केटमध्ये इंदूरवरून खास प्रकारचे म्युझिकल लायटिंग शो भक्तांना आकर्षित करणार असल्याचे गोपी घोडेले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...