आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:बँक डेटा चोरीच्या तपासासाठी पुण्याहून आलेले पथक रिकाम्या हाती परतले

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बँकांतील निष्क्रिय खात्यांची (डॉरमंट अकाउंट) माहिती मिळून त्यातून दोन अब्ज सोळा कोटी ३९ लाख रुपये चोरण्याचा कट रचणाऱ्या टोळीतील आरोपी विशाल धनंजय बेंद्रे (४५, रा. बालाजीनगर) याच्या घराची पुण्याहून अालेल्या पथकाने गुरुवारी झडती घेतली. पॅन कार्ड व एसबीअायचे पासबुक वगळता घरात विशेष काही मिळाले नाही. त्यामुळे पथक परत गेले. याच प्रकरणातील दुसरे आरोपी परमजितसिंग संधू (४२) आणि राजेश शर्मा (४२) यांची पथकाने चाैकशी केली नाही. यासाठी स्वतंत्र पथक येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सहायक पोलिस निरीक्षक गणेश पवार, अंमलदार शाहरुख शेख आणि अनुप पंडित या तिघांच्या पथकाने बेंद्रेला साेबत आणले होते. त्याच्या घरात कागदपत्रे, मोबाइल, लॅपटॉप आशा काही वस्तू सापडतात का, याचा शोध घेण्यासाठी हे पथक आले होते. मात्र, पॅन कार्ड व पासबुक वगळता विशेष काही सापडले नाही. त्याने वेगवेगळे पॅन कार्ड तयार केल्याचा संशय अाहे. विशाल हा मूळचा वाशीमचा आहे. काही वर्षांपूर्वी ताे औरंगाबादेत आला. तो मनसेचा सक्रिय कार्यकर्तादेखील होता. त्याची या टोळीसोबत कशी ओळख झाली, संधू आणि शर्मा हे त्याच्या कधी संपर्कात आले, याचा तपास सुरू आहे. प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाच ते सहा विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकाकडे वेगवेगळ्या आरोपींची जबाबदारी आहे. गुजरात आणि हैदराबाद येथेदेखील पथक गेले अाहे.

डेटा कसा लीक झाला याचा तपास सुरू
या टोळीने सीएसआरसाठी वापरली जाणारी बँक खाती लक्ष्य केली होती. एका अकाउंटमध्ये तब्बल १०० कोटींची ठेव होती. अनघा मोडक हिने हा डेटा मिळवला. त्यासाठी तिला अडीच कोटी रुपये हवे होते. हे पैसे संधू, शर्मा व इतर आरोपी देणार असल्याचे तपासात समोर आले आहे. या टोळीत अजून कुणाचा समावेश आहे का, बँकेतून डेटा कसा लीक झाला, याचा तपास पोलिस करत आहेत. संधू, शर्मा यांच्यासाेबत जालना, औरंगाबादचे कुणी मोठे व्यक्ती आहेत का, हे मात्र गुलदस्त्यातच आहे.

बातम्या आणखी आहेत...