आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अजब नियम:बँक मॅनेजर : आता तुझं वय झालं, कर्ज मिळणार नाही, वृद्ध शेतकरी : वयं झालं तरी म्या शेतकरीच हाय ना वं

फुलंब्री / पंढरीनाथ काळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • म्हातारा झाला म्हणून पीरबावड्याच्या शेतकऱ्याला बँकेने पीक कर्ज नाकारले

शासन शेतकरी आत्महत्या राेखण्यासाठी विविध उपाययाेजना करत असले तरी कागदी घाेडे नाचवणारी मंडळी या याेजनांत अडसर ठरत आहे. फुलंब्री तालुक्यातील एका वयाेवृद्ध शेतकऱ्याने बँक अाॅफ महाराष्ट्रकडे कमी मुदतीच्या पीक कर्जाची रीतसर मागणी केली. पण दाेन महिने पाठपुरावा करूनही त्यास पीक कर्ज मिळाले नाही. शेवटी शेतकरी बँकेत पाेहाेचला तेव्हा त्याला बँक व्यवस्थापकाने पीक कर्ज नाकारण्याचे अजब कारण सांगितले. ‘आता तुझं वय झालं. कर्ज देता येणार नाही’, असे सांगून व्यवस्थापकांनी या शेतकऱ्याला कर्ज देण्यास नकार दिला. ‘म्हातारा असलाे तरी म्या शेतकरीच हाय ना वं’, अशी बाजू या वृद्ध शेतकऱ्याने लावून धरली. पण व्यवस्थापक नरमले नाही. त्यांनी शेतकऱ्याला हाकलून दिले.

फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथील शेतकरी कचरू बोकील यांचा सातबारा कोरा आहे. कर्ज फेडण्याची धास्ती त्यांना वाटत असल्याने त्यांनी आजपर्यंत कधीच कर्ज घेतले नाही. पण या वेळी सुधारित पद्धतीने शेती करण्यासाठी त्यांनी वडोदबाजार येथील महाराष्ट्र बँकेकडे पीक कर्जासाठी ३० मे पूर्वीच अाॅनलाइन अर्ज केला. दोन महिन्यांत चार खेटे मारूनही बोकील यांच्या पीक कर्जाच्या अर्जावर विचार झाला नाही. कचरू बोकील यांची १ जानेवारी १९४८ ही जन्म तारीख आहे. त्यांच्या नावावर ४.५९ आर शेतजमीन आहे. आपले वय ७० हून अधिक झाल्याची जाणीव करून देत बँक व्यवस्थापकांनी आपल्याला बँकेतून हाकलून दिले. तसेच कुठे तक्रार करायची ते करा, असे धमकावल्याचे बोकील यांचे म्हणणे आहे.

कर्जाचा उद्देश व निकष : बोकील यांनी ज्या पीक कर्जासाठी विनंती केली होती ते कमी कालावधीच्या कर्जाचा प्रकार आहे. पीक लागवड, पीक कापणीनंतरचा खर्च, शेतकरी कुटुंबांची आर्थिक निकड, शेती उपकरणांची देखभाल व खरेदी, कृषी उपक्रमांसाठी भांडवल आदींसाठी तीन लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक महाबँक किसान क्रेडिट कार्ड (एमकेसीसी)अंतर्गत कर्ज दिले जाते. अशा कर्जासाठी शेतकरी असणे हाच निकष आहे. त्यासाठी वयाची कोणतीही अट नाही.

पीक हीच कर्जफेडीची हमी
पीक कर्ज घेताना त्या शेतकऱ्याचा सातबारा बघितला जातो. फक्त कर्ज घेताना सदरील व्यक्ती सज्ञान असावी लागते. कर्जदार शेतकरी मृत्यू किंवा मुले वेगळी निघाली तरी कर्जाचा बोजा त्याच सातबारावर राहतो. एक लाखांपर्यंतच्या पीक कर्जासाठी श्ेतीत येणारे पीक तारण हीच एक हमी असते. अधिक कर्जासाठी जामीनदार किंवा शेती गहाण ही हमी असते. त्यामुळे बडोदबाजारच्या महाराष्ट्र बँक शाखेने वयाच्या आधारावर शेतकऱ्याचा कर्ज प्रस्ताव नाकारलाच कसा, हा संशोधनाचा विषय आहे.

सन्मानाने शेती केली
मी आतापर्यंत कधीही खासगी वा अन्य बँकेकडून कर्ज घेतले नाही. आयुष्यभर मी जमिनीचा सातबारा कोरा ठेवला आहे. सन्मानाने शेती करीत आहे. मात्र यंदा कोरोनाच्या सावटामुळे माझ्यावर आर्थिक संकट आले आहे. त्यात माझे वय अधिक असल्याने बँक पीक कर्ज देत नाही. कुटुंबातील कोणावरही कोणतेही कर्ज असल्यास आम्ही पीक कर्ज देऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट सांगत लेखीही दिले. त्यानंतर पीक कर्ज न मिळाल्यामुळे मी पेरणी करण्यासाठी उसनवारीने एक लाख रुपये घेतले. त्यानंतर बियाणे, खते घेऊन मी पेरणी केली. यामुळे मी पूर्णपणे हतबल झालो असल्याचे बाेकील यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले.

थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
महाराष्ट्र बँकेने कर्ज नाकारल्याने बोकील यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र वजा निवेदन धाडले. तसेच कृषी मंत्री, बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल अधिकारी, वडोद बाजार शाखा अधिकारी, जिल्हा अग्रणी बँक यांना या पत्राच्या प्रतिलिपी दिल्या. या निवेदनात त्यांनी आपल्याला वयाच्या मुद्द्यावर कर्ज नाकारल्याचे नमूद करतानाच संबंधित बँक अधिकाऱ्यांनी ‘पुन्हा बँकेत आला तर बघ. माझी कुठेही तक्रार करा, कोणालाही सांगा, माझे काहीच होऊ शकत नाही. तुमचे वय जास्त असल्यामुळे, या योजनेस अपात्र ठरत आहात’, अशा शब्दांत धमकावत हाकलून दिले, असा अाराेप केला अाहे.

वय झाले म्हणून हक्क कसा नाकारता?
मी वृद्ध झालो म्हणजे माझे आयुष्य संपले आहे का, शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळते. वय झाले म्हणून मतदानाचा हक्क नाकारला जातो का? मग माझा सातबारा कोरा असूनही पीक कर्ज का मिळत नाही? देशाच्या पोशिंद्याला जमीन तारण ठेवूनही बँक कर्ज देत नाही. आमचा मताधिकारही काढून घ्या व सर्व वृद्ध शेतकऱ्यांना गोळ्या घाला किंवा मला आत्महत्येची परवानगी द्या. पंधरा दिवसांत पीक कर्ज मिळाले नाही तर मी आत्महत्या करणार असून याला मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी. कृषिमंत्री, महाराष्ट्र बँकेचे मुख्य अधिकारी जबाबदार असतील. -कचरू एकनाथ बोकील, शेतकरी

चाैकशी करत अाहाेत
बँक शेतकऱ्यांसाठी बांधील आहे. फक्त त्याचे रेकॉर्ड चांगले पाहिजे. शेतकऱ्याच्या तक्रारीची मलाही माहिती मिळाली आहे. चौकशी करण्यात येत आहे. -अहिलाजी थोरात, झोनल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र औरंगाबाद

हा नवीनच प्रकार
आम्ही शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी प्रयत्न करतोय. परंतु हा प्रकार नवीनच आहे. जिल्हाधिकाऱ्यांनाही माहिती कळवली आहे. -अनिल कुमार दाबसेट्टे, जिल्हा निबंधक, औरंगाबाद,