आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत:बँक ऑफ महाराष्ट्रचे विलीनीकरण नाहीच, खासगीकरणही नाही : डॉ. भागवत कराड

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबादचा कृषी कर्ज पॅटर्न देशभर राबवणार

‘काेणत्याही परिस्थितीत बँक ऑफ महाराष्ट्रचे विलीनीकरण किंवा खासगीकरण हाेणार नाही. तसेच मराठवाडा व विदर्भात राष्ट्रीयीकृत बँकांच्या जास्तीत जास्त शाखा उघडल्या जातील यासाठी आपण प्रयत्न करू,’ अशी ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी दिली. औरंगाबादमध्ये पाेर्टलच्या माध्यमातून कृषी कर्ज वाटपाचा प्रयाेग यशस्वी झाला आहे, त्याची माहिती घेऊन देशभरातील सर्व बँकांमध्ये तसाच पॅटर्न लागू करण्यासाठी प्रयत्न करू,’ असेही त्यांनी ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

प्रश्न : देशात बँकांच्या विलीनीकरणाचे वारे सुरू आहे. बँक ऑफ महाराष्ट्रबाबतही चर्चा आहे?
डाॅ. कराड : या बँकेबाबत मी माहिती घेतली आहे. ही बँक चांगल्या प्रकारे काम करत आहे, म्हणून तिचे कुठल्याही बँकेत विलीनीकरण किंवा खासगीकरण हाेणार नाहीच. जनआशीर्वाद यात्रेच्या वेळी मला मराठवाड्यात बँकांच्या शाखा कमी असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. त्या वाढवण्यासाठी सर्व विभागीय व्यवस्थापकांना बाेलून मी प्रयत्न करणार आहे.

प्रश्न : ‘एसबीएच’च्या विलीनीकरणानंतर मराठवाडा-विदर्भातील बँक शाखा कमी झाल्या. फडणवीसांनीही मराठवाड्यात बँकांचे जाळे वाढवण्याची गरज व्यक्त केली होती. मात्र पाच वर्षांत ते झाले नाही. आपण काय करणार?
डाॅ. कराड : अर्थ राज्यमंत्री या नात्यान मराठवाडा, विदर्भात जिथे गरज आहे तिथे राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा काढण्याच्या सूचना दिल्या जातील.

प्रश्न : औरंगाबादेत गेल्या वर्षी ऑनलाइन कृषी कर्जवाटप यशस्वी झाले. उद्दिष्टाच्या १२३ टक्के वाटप झाले. देशात हाच पॅटर्न लागू केल्यास शेतकऱ्यांची वेळखाऊ कर्ज प्रक्रियेतून सुटका हाेऊ शकेल...
डाॅ. कराड : औरंगाबादचा प्रयाेग चांगलाच आहे. आम्ही या प्रक्रियेची पूर्ण माहिती घेत आहाेत. सर्व बँकांच्या चेअरमनना बाेलून या प्रयाेगाबाबत सूचना दिल्या जातील.

प्रश्न : बजेटमध्ये मराठवाड्याची नाराजी यंदा तरी दूर हाेईल का?
डाॅ. कराड : बजेटपूर्वीच अनेक प्रश्न साेडवण्याचे प्रयत्न आहेत. रेल्वेसाठीही लवकर निधी देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. उद्याेजकांच्याही काही मागण्या आहेत. त्यासाठी नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची टीम औरंगाबादेत येणार आहे. पंढरपूर ते केंब्रिज चौक, नगर नाका दौलताबाद, कन्नड घाट या कामांची ते पाहणी करतील.

औरंगाबादचा कृषी कर्ज पॅटर्न देशभर राबवणार
अग्रणी बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी हा प्रयोग केला होता. यात शेतकऱ्यांनी लीड बँकेच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज भरायचा. एनआयसी पोर्टलवर ही लिंक आहे. यात प्रत्येक बँकेला लॉगिन आयडी दिले आहेत. शेतकऱ्याने अर्ज केल्यानंतर संबंधित बँक मॅनेजरकडे अर्ज जाताे. बँका शेतकऱ्याचा सातबारा भूमी अभिलेखकडून डाऊनलोड करून घेतात. त्यामुळे व्हेरिफिकेशनची गरज पडत नाही. तीन आठवड्यांनंतर शेतकऱ्यांना एसएमएस जाताे. त्यांनी बँकेत जाऊन इतर प्रक्रिया पार पाडली की कर्ज दिले जाते. गेल्या वर्षी याच पद्धतीने औरंगाबादेत १४९६ कोटींचे उद्दिष्ट असताना १८५१ कोटी कर्ज वाटप झाले.

बातम्या आणखी आहेत...