आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्रीवादळाची वर्षपूर्ती:‘तौक्ते’च्या अलर्टकडे दुर्लक्ष केल्याने बुडाले होते बार्ज पी-305, वेळेचे गणित चुकल्याने जहाजाचे झाले होते टायटॅनिक

औरंगाबाद | महेश जोशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

१६ आणि १७ मे २०२१ दरम्यान कोकणासह मुंबई किनारपट्टीला झोडपून टाकणाऱ्या तौक्ते चक्रीवादळात सापडून बार्ज पी-३०५ जहाजावरील ओएनजीसीच्या ७५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. चक्रीवादळाच्या ६ दिवस आधीच अलर्ट देण्यात आला असताना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. जहाज सुरक्षित समुद्रात हलविले नाही. यावरील जीवरक्षक बोटी, जॅकेट निकामी होते. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचाही वानवा होती. यामुळेच जहाज भरकटले व एवढे जीव मृत्युमुखी पडल्याचे निष्कर्ष पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारीत गठीत संसदीय समितीने काढले आहेत.पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संसदीय स्थायी समितीने २०२१-२२ च्या वार्षिक अहवालात “तेल प्रकल्पातील सुरक्षा व तौक्ते वादळाचा अपघात’ याचा आढावा घेतला. जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांच्यासह ३१ सदस्यांचा समावेश असणाऱ्या समितीच्या ५ बैठका झाल्या. ६ एप्रिल रोजी तो संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात आला. यात ओएनजीसीवर कडक शब्दात ताशेरे ओढण्यात आले आहेत.

सहा दिवस आधीच अलर्ट, तरी...
हवामान खात्याने वादळाचा पहिला अलर्ट ११ मे २०२१ रोजी दिला. त्यानंतर रोज अलर्ट येत होते. मेरीटाइम रेस्क्यूकडूनही अलर्ट येत होते. मात्र, ओनएजीसीचा स्कायमेटसोबत करार असल्याने त्यांनी या अलर्टकडे दुर्लक्ष केले. स्कायमेटने १२ व १४ मे रोजी अलर्ट दिले. १४ तारखेलाच सुरक्षित समुद्रात जाण्याची सूचना दिली. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

स्कायमेटने भरकटवले?
२०१० पर्यंत कंपनीला भारतीय हवामान खात्याची सेवा मिळायची. ती बंद करून स्कायमेट या कंपनीची निवड केली. त्यावर समितीने नाराजी वर्तवली आहे. प्रत्येक देशात तेथील राष्ट्रीय हवामान खाते हवामानाचे अंदाज वर्तवते. तौक्तेबाबत हवामान खात्याचे अंदाज अचूक ठरले, तर स्कायमेटचे चुकले.

सकाळी : १७ रोजी ७:१४ वाजता सर्व ८ अँकर तुुटल्याने जहाज समुद्रात भरकटू लागले. सकाळी ९:३५ वाजता जहाजाचा समोरील भागात छिद्र पडल्याने इंजिन रूम, रेडिओ यंत्रणा, जीपीएस ऑफिस आणि लाइट सेक्शनमध्ये पाणी शिरले.
दुपारी : ३:३० वाजता ओनएनजीसीच्या नौकांसह नौदलाची आयएनएस कोची युद्धनौका आली. परंतु पाऊस, उसळणाऱ्या लाटा आणि ताशी १०० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने बचावकार्यात अडचणी आल्या. यामुळे सर्वांनी १५-२० जणांच्या गटात एकमेकांचे हात धरत पाण्यात उड्या मारल्या.
संध्याकाळी : ६ वाजता जहाजाचा एक भाग तर ७:०५ वाजता जहाज पूर्णपणे बुडाले. उड्या न मारणारे जहाजासोबत पाण्यात बुडाले.

जहाजाचे सर्व ८ नांगर तुटले होते, सीसीटीव्ही बंद होता, ४० %कर्मचारी अप्रशिक्षित होते
1. लाइफ राफ्ट निरुपयोगी :
संकटसमयी जहाजाबाहेर पडण्यासाठी १४ लाइफ राफ्ट पाण्यात उतरवले, पण ते पंक्चर होते. त्यांचे सर्व्हिसिंग झाले नसावे वा दर्जा खराब असावा. लाइफ सेव्हिंग बोट्सही नव्हत्या.
2. अँकर झाले निष्क्रिय : जहाजावर सॅप प्रणालीवर आधारित अँकर होते. मात्र ते तुटले. कसेतरी जहाज मूळ जागेवरून १७५ मीटरवर हलवले. मात्र, प्रवाशांचा विचार केला नाही.
3. वेळेचे गणित चुकले : सुरक्षित पाण्यात जाण्याचे ठरवूनही कित्येक तास जहाज अँकरने बांधलेले होते. धोका वाढल्यावर सुरक्षित पाण्यात जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेचे गणित चुकले. नंतर ते तुटून जहाज बुडाले.
4. रिस्क असेसमेंट नाही : जहाज समुद्रात उतरण्यापूर्वी ओएनजीसीने चाचण्या करणे गरजेचे होते. त्याकडे दुर्लक्ष झाले. लाटा-हवेचा मारा पेलण्यासाठी असेसमेंट झाले नव्हते.
5 . स्थिती हाताळण्यात अपयश : वादळाने ऐनवेळी दिशा बदलल्याचे सांगितले जात असले तरी पूर्वसूचना मिळूनही ओएनजीसीचा ढिसाळपणा व सामना करण्यातील अपयश दिसते.
6. अप्रशिक्षित कर्मचारी : फक्त ५८.३३% टक्के कर्मचाऱ्यांकडेच समुद्रात जहाजावर काम करण्यासाठी आवश्यक डीजीएस, एमटीआय प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र होेते. उर्वरीत ४१.६६% कर्मचारी अप्रशिक्षित होते.
असे असते बार्ज, त्याचे कामही असे चालते

पश्चिम किनारपट्टीवर ओएनजीसीच्या कामांसाठी ५० जहाजे व २२ बार्जेस म्हणजेच तराफे होते. बार्जना इंजिन नसते. ते मोठ्या जहाजांतील माल उतरवणे, त्यांना अन्न पोहोचवणे याचे काम करतात. ते खोल समुद्रात उतरत नाहीत. कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी

तेल-नैसर्गिक वायूशी संबंधित कायद्यांची अंमलबजावणी होत नाही. कोणावर जबाबदारी निश्चित करायची हे स्पष्ट होत नाही. नियमावलींच्या पालनाची शिफारस केली आहे.' - उन्मेष पाटील, खासदार तथा सदस्य, संसदीय समिती

बातम्या आणखी आहेत...