आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शेतकरी संघटनेचा एल्गार:दूध दरवाढीसाठी बैलाला घातली आंघोळ, सरकाररूपी दगडाला दुधाचा अभिषेक

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, दुधाची वाहने अडवली

दुधाचे दर वाढवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात आंदोलन छेडले आहे. नांदेड जिल्ह्यात तर कार्यकर्त्यांनी बैलाला दुधाने आंघोळ घालून सरकारचा तीव्र निषेध केला.

बैलाला दुधाने आंघोळ घालून सरकारचा निषेध

नांदेड | स्वाभिमानीच्या वतीने दूध दरवाढीसाठी धानोरा येथे बैलांना दुधाने आंघोळ घालून आंदोलन करण्यात आले. प्रकाश पोपळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. बैलाला दुग्धाभिषेक झाल्यानंतर मंदिरातही हनुमानाच्या मूर्तीलाही दुग्धाभिषेक करून सरकारचा निषेध करण्यात आला.

सरकाररूपी दगडाला दुधाचा अभिषेक

परभणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शासकीय दूध डेअरी जवळ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडाला दुधाचा अभिषेक करीत दूध रस्त्यावर ओतून दिले. संघटनेने मंगळवारी एक दिवसाचा लाक्षणिक दूध बंद आंदोलन केले. खाजगी दूध संकलन व दूध डेअरीत दूध संकलन करण्यात येऊ नये. कुठलेही दुधाचे टँकर डेअरीच्या बाहेर पाठवण्यात येऊ नये, अशी भूमिका संघटनेने घेतली. वसमत रस्त्यावरील शासकीय दूध डेअरीसमोर आंदोलन करीत दूध रस्त्यावर सांडवले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटिंग, संतोष पोते यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

जालन्यात अडवल्या दुधाच्या गाड्या

जालन्यात दूध संकलन केंद्रांवर जाणाऱ्या दुधाच्या गाड्या अडवल्या. तर बदनापुरात मंगळवारी कृषी पदवीधारक संघटनेच्या वतीने दूध फेकून किंवा सांडून न देता गरजूंना वाटप करून अभिनव आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना लिटरमागे दहा रुपयांचे अनुदान द्या अथवा आंदोलन करू, असा इशारा मनसेने निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना िदला.

डोंगरकडा येथे रस्त्यावर दूध ओतले

हिंगोली | कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय महामार्गावर दूध सांडून आंदोलन केले. यावेळी केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध केला. डोंगरकडा फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बेगाजीराव गावंडे, प्रभाकरराव गावंडे, दिगंबर गावंडे, लक्ष्मणराव अडकिणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.