आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस आयुक्तांकडून विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी पाहणी:डीजे वाजणार नाही याची खबरदारी घ्या ; डॉ. गुप्ता

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती विसर्जन मिरवणुकांची पूर्वतयारी म्हणून पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दोन दिवसांपासून विसर्जन मिरवणुकीचे मार्ग, त्यावरील प्रत्येक चौक व विहिरींच्या परिसराची पाहणी सुरू केली आहे. या मार्गांवरील गर्दीचे नियोजन व बंदोबस्त कसा असावा, याच्या आराखड्याच्या अनुषंगाने त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजणार नाही याची खबरदारी घ्या, गणेश मंडळांना ते समजावून सांगा, अशा सूचनाही आयुक्तांनी केल्या आहेत.

यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. ८०० हून अधिक मंडळांनी नोंदणी केली आहे. त्याशिवाय अनेक छोटी-मोठी मंडळे मिळून ही संख्या हजारच्या पुढे गेली आहे. त्यामुळे गणेश विसर्जनाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस विभाग सतर्क झाला आहे. आयुक्त डॉ. गुप्ता यांनी शुक्रवारी एन-१२ येथील विहीर व त्या दिशेने येणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गांची पाहणी केली. यावेळी उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, निरीक्षक संभाजी पवार यांच्याशी चर्चा केली. तर शनिवारी त्यांनी गजानन महाराज मंदिर चौक, सूतगिरणी चौक, शिवाजीनगर, उस्मानपुरा, शहानुरमियाँ दर्गा या प्रत्येक चौकात उभे राहून अंदाज घेतला. शिवाय नकाशाच्या आधारे नियोजनाच्या अनुषंगाने सूचना केल्या. यावेळी उपायुक्त गिऱ्हे, सहायक आयुक्त विशाल ढुमे, निरीक्षक दिलीप गांगुर्डे, संतोष पाटील, गीता बागवडे उपस्थित होते.

डीजे वाजणार नाही यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा
गुप्ता यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात प्रत्येक मंडळाशी संपर्क करा, भेट देण्याचा प्रयत्न करा. डीजे वाजणार नाही यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा. डीजेच्या गुन्ह्याचे गंभीर परिणाम, दुष्परिणाम सांगा. पारंपरिक वाद्यासाठी प्रोत्साहित करा. ठाण्यातील लाठीपासून प्रत्येक साहित्य तपासून पाहा. ठाण्यात डीओ अधिकारी कायम उपस्थित राहायलाच हवा, अशा सक्त सूचना त्यांनी केल्या.

बातम्या आणखी आहेत...