आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:पळवून लग्न केल्यामुळे कोयत्याने मारहाण; ६ आरोपींना सक्तमजुरी

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुलाने मुलीला पळवून नेत तिच्यासोबत लग्न केल्याच्या कारणावरून मुलीच्या मामासह सहा जणांनी मजुरासह त्याचा मुलगा व पत्नीला कोयता, कुऱ्हाड, चेन आणि काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना ८ मार्च २०१३ रोजी केकत जळगाव (ता. पैठण) परिसरात घडली होती. याप्रकरणी मुलीचा मामा सोमनाथ हरिभाऊ बनकर (२६), सुरेश हरिभाऊ बनकर (३२), विष्णू हरिभाऊ बनकर (२७), हरिभाऊ दोणाजी बनकर (६०), बंडू त्रिंबक मगर (३०) आणि दशरथ लक्ष्मण अभंग (३७, सर्व रा. केकत जळगाव, ता. पैठण) या सहा आरोपींना सात वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली ६६ हजारांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी बुधवारी ठोठावली. विशेष म्हणजे ठोठावलेल्या दंडाची रक्कम गुन्ह्यातील जखमींना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

याप्रकरणी भिकाजी तुळशीराम सोनवणे (६०, रा. केकत जळगाव ता. पैठण) यांनी पाचोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवांसह राहतात. ते मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. घटना घडण्याच्या साडेचार वर्षांपूर्वी फिर्यादीचा मुलगा प्रकाशने गावातील मुलगी उषाबाईसोबत पळून जाऊन लग्न केले होते. दरम्यान, त्यांना एक मुलगादेखील आहे. ८ मार्च २०१२ रोजी फिर्यादी मजुरी करून घराकडे परतत असताना त्यांना उषाबाईचा मामा सोमीनाथ बनकरने अडवले व तुझ्या मुलाने भाचीला पळवून का नेले, असे म्हणत शिवीगाळ करून कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात व पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. हा आरडाओरडा ऐकून फिर्यादीचा मुलगा, पत्नी व भाऊसाहेब दळवी हे तिघे फिर्यादीला वाचवण्यासाठी गेले असता वरील सर्व आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून काठ्या, चेन, कोयता, कुऱ्हाडीने मारहाण करीत गंभीर जखमी केले.

सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता कैलास पवार (खंडाळकर) यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. विशेष म्हणजे यात चार पंच फितूर झाले. तर फिर्यादी, फिर्यादीचा भाऊ व डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवून कलम ३०७ अन्वये ७ वर्षांची सक्तमजुरी, प्रत्येकी १० हजारांचा दंड आणि कलम १४८ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी एक हजाराच्या दंडाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून जमादार जाफर पठाण, जाधव यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...