आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूजमध्ये पुन्हा झुंडशाही:कंत्राटी कर्मचाऱ्याची कंपनीत घुसून HR विभागाच्या अधिकाऱ्यास मारहाण, वस्तूंची तोडफोड

प्रतिनिधी | वाळूज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामचुकारपणा करणाऱ्या कामगाराला एचआर विभागाच्या अधिकाऱ्याने 'काम नसेल करायचे तर घरी निघून जा' असे म्हणत टोकले. हाच राग मनात धरत कंत्राटी कामगाराने तात्काळ जोगेश्वरी येथील मित्रांना फोन करून कंपनीत बोलावून घेतले. हातात लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या १० ते १२ जणांच्या टोळक्याने कंपनीत प्रवेश करत आतील कॅबिन, खुर्च्या आदींची तोडफोड केली. तसेच, सुरक्षा रक्षक व एचआर विभागाच्या अधिकाऱ्यास शिवीगाळ करत मारहाण केली.

नेमके काय झाले?

वाळूज औद्योगिक परिसरातील एम-१५२ सेक्टरमध्ये असणाऱ्या श्री गणेश प्रेस अँड कोट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत ऋषभ शेळके (वय 22, रा.जोगेश्वरी) हा कामगार अमन लेबर सप्लायर यांच्या माध्यमातून कंत्राटी कामगार म्हणून काम करतो. घटनेबाबत कंपनी प्रशासनाने सांगितले की, ऋषभ शेळके याचा स्थानिक मुलांसोबत परिचय असल्याने तो कायमच कामावर वेळकाढूपणा करत काम करत असल्याने त्याला एचआर विभागाचे गणेश बटुळे (वय ३२, रा. रांजणगाव) यांनी फटकारले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. पुढे याच करणातून मित्रांना बोलावून घेत शेळकेने कंपनीत जबरदस्ती प्रवेश करत आतील सामानांची तोडफोड केली. हा सर्व प्रकार कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला.

सुरक्षा रक्षक जखमी

या घटनेत दोन सुरक्षा रक्षक तसेच एचआर विभागाचे गणेश बटुळे, तन्वीर दुर्राणी आणि संजय पठारे जखमी झाले आहेत. तर, ऋषभ शेळकेसुद्धा जखमी झाला आहे. याप्रकरणी दोन्ही गटाचे लोक एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

...तर घटना टळली असती

दैनिक दिव्य मराठीने यापूर्वीच एम सेक्टरमधील बंद पडलेल्या पोलीस चौकीचा मुद्दा उपस्थित केला होता. जर ही पोलिस चौकी सुरू असती तर कदाचित कंपनीत घुसून अर्धा तास दहशत पसरवणास आरोपींची हिंमत झाली नसती. कारण ही पोलिस चौकी घटना घडली त्या कंपनीपासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. आतातरी पोलिस प्रशासनाने बंद पडलेली पोलिस चौकी सुरू करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...