आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता नवीन पास सिस्टिम:घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरला मारहाण, ‘मार्ड’चे काम बंद आंदोलन

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) निवासी डॉक्टर उदय चेंदूर यांना मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता मारहाण करण्यात आली. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी बुधवारी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने घाटी प्रशासनाने रुग्णांसाठीचे व्हिजिटर अवर बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच खासगी रुग्णालयांप्रमाणे घाटीत पास सिस्टिम लागू करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांनी दिली. दरम्यान, घाटीतील सुरक्षेची जबाबदारी मेस्को आणि एमएसएफवर आहे. मारहाणीनंतर या कंपन्यांच्या सहा जणांना निलंबित करण्यात आले.

घाटीमध्ये मध्यरात्री २ वाजता डोक्याला मार लागलेल्या मोहंमद तौफिक मोहंमद इम्रान आणि त्यांचे तीन नातेवाईक आले. त्यांनी रुग्णावर तातडीने उपचार करा, अशी मागणी करत शिवीगाळ केली. त्यातील एकाने डाॅ. चेंदूर यांच्या उजव्या डोळ्याच्या भुवईवर हातातील कड्याने मारले. याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी घटनास्थळी धाव घेतली.

वरिष्ठ डॉक्टरांनी घेतली बैठक : मार्डचे डॉक्टर, उपअधिष्ठाता डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ सिराज बेग यांच्यासह सर्व वरिष्ठ डॉक्टरांची बैठक झाल्यानंतर घाटीत रुग्णाच्या भेटीसाठी असणाऱ्या वेळा बंद करण्यात आल्या. सकाळी सात ते आठ, दुपारी बारा ते चार आणि संध्याकाळी पाच ते सात या वेळेत नातेवाइकांना रुग्णांना भेटण्यासाठी वेळ दिलेला होता. आता या वेळेत भेट घेता येणार नाही.

मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद
मार्डचे अध्यक्ष डॉ. अक्षय क्षीरसागर म्हणाले, आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. घाटीत सुरक्षा व्यवस्थेच्या त्रुटी आहेत. उपअधिष्ठाता डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढू, असे सांगितले. दरम्यान, आता अपघात विभागाची सुरक्षा मेस्कोकडे मेडिसिन विभागाची सुरक्षा एमएसएफकडे असे.

गर्दी कमी करण्याचा निर्णय
डाॅ. रोटे म्हणाल्या, रुग्णांना भेटण्यासाठी लोक येतात. त्यामुळे गर्दी होते. आता केवळ दोघांनाच पास मिळेल. दुसऱ्या नातेवाइकांना यायचे असेल तर पहिल्या नातेवाइकांनी त्यांचा पास इतर नातेवाइकांना देत बाहेर थांबावे. त्यामुळे गर्दी कमी होईल. सुरुवातीला अपघात विभागात अन् नंतर मेडिसिन इमारतीमध्ये ही पद्धत लागू करण्यात येणार आहे.

... तर गर्दी टाळण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना जेवण बंद करावे लागणार
घाटीत अनेक सामाजिक संघटना मोफत जेवण पुरवतात. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांपेक्षा बाहेरचे लोकच हे जेवण घेऊन जातात. बरेचसे अन्न फेकून दिले जाते. त्यामुळे अशा संस्थांनाही बंदी घालण्याचा निर्णय घाटी प्रशासनाने घेतला आहे. त्यांना गुरुवारपासून समजावून सांगण्यात येईल. ज्यांना मोफत जेवण द्यायचे आहे त्यांनी प्रशासनाला धान्य द्यावे. ते घाटी किचनमध्ये शिजवून रुग्णांना दिले जाईल.

बातम्या आणखी आहेत...