आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Rajya Sabha Election 2022 BJP Objected To The Votes Of 3 Leaders Of MVIA At Half Past Noon Around 1 Pm, The Decision Of The Commission Was Announced | Marathi News

रहस्यसभा:कारण... दुपारी दीड वाजता मविआच्या 3 नेत्यांच्या मतांवर भाजपने घेतला आक्षेप, रात्री 1 च्या सुमारास आयोगाचा निर्णय जाहीर

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आकड्यांचे खेळ आणि राजकीय डावपेचांनी रंगलेल्या राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांची निवडणूक प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही थरारक राहिली. महाविकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतांवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजप पोहोचले. यानंतर तब्बल ११ तासांपेक्षा अधिक काळ लोटून गेल्यावरही निवडणूक आयोग मतमोजणीचा निर्णय जाहीर करू शकला नाही. रात्री १ च्या सुमारास आयोगाने अखेर निर्णय जाहीर केला. त्यानुसार शिवसेनेचे नाशिक जिल्ह्यातील आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवले, तर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या यशोमती ठाकूर या दोघांची मते वैध ठरवली. याशिवाय विरोधकांनी आक्षेप घेतलेल्या भाजपचे सुधीर मुनगंटीवर व अपक्ष आमदार रवी राणा यांची मते वैध ठरवण्यात आली. कांदे यांची मतपत्रिका बाजूला ठेवून मतमोजणी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने या वेळी दिले. अखेर रात्री १.४० वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला.

कांदे यांचे मत बाद कारण... : निवडणूक आयोगाने आमदार सुहास कांदे यांचे मत बाद ठरवताना जो निकष लावला तो असा की, न दुमडलेली मतपत्रिका घेऊन कांदे फिरत होते. ती इतरांनाही दिसल्याने नियमाचे उल्लंघन झाले. त्यामुळे त्यांचे मत बाद ठरते. दरम्यान, हे मत शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कोट्यातील असल्याचे समजते. शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणल्या गेलेल्या आणि अतिरिक्त मतांच्या मुठी अधिकाधिक घट्ट झालेल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी विधानसभेच्या आवारात सकाळी मतदानास सुरुवात झाली. सर्व पक्षांतर्फे कडेकोट बंदोबस्तात आमदार दाखल झाले. मात्र, दुपारनंतर तांत्रिक मुद्द्यांवरून मतदान केंद्र राजकारणाचे व्यासपीठ बनले.

  • नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे मत आयोगाने ठरवले बाद
  • जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर यांच्यासह सुधीर मुनगंटीवार, रवी राणांची मते वैध
  • ... अन् निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर रात्री १.४० वाजता मतमोजणीस प्रारंभ

आघाडी-भाजपचे परस्परांविरोधात आक्षेप
या मतदानाच्या वेळी पक्षीय आमदारांना त्यांची मतपत्रिका मतदान प्रतिनिधीस दाखवून मतपेटीत टाकण्याची मुभा आहे. मात्र, राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हातात, तर काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या हातात मतपत्रिका दिल्याने नियमाचा भंग झाल्याची तक्रार भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी अन्य पक्षांच्या प्रतिनिधींनी दिसेल अशा प्रकारे मतदान केल्याचा तिसरा आक्षेप घेण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या तिन्ही आक्षेपांची दखल न घेतल्याने भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे या तिघांची मते बाद ठरवण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर शिवसेनेने भाजपचे माजी मंत्री व विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मतपत्रिका पक्ष प्रतिनिधीस दाखवल्याची व आमदार रवी राणा यांनी हनुमान चालिसा दाखवून मतदारांना आकृष्ट केल्याची तक्रार घेऊन त्यांची मते बाद करावीत या मागणीसाठी केंद्रीय निवडणूक आयोग गाठला.

२०१७ मधील अहमद पटेल केसचा भाजपने घेतला आधार
सन २०१७ च्या राज्यसभा निवडणुकीत सदस्याने तांत्रिक नियमांचे उल्लंघन केल्यास मतदानानंतर मतमोजणी थांबवण्यात आली होती. त्यामुळे बाद मतांमुळे मतांचा कोटा बदलल्याने तेव्हा अहमद पटेल केवळ अर्ध्या मताने विजयी झाले होते. भाजपने त्याच मुद्द्याचा आधार घेऊन या निवडणुकीत महाविकास आघाडीची तीन मते बाद करण्याची मागणी करीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली.

घडामोडी
मंत्र्यांना मुंबईत थांबण्याचे आदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शनिवारचा पिंपरी-चिंचवडचा दौरा रद्द करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या सर्व मंत्र्यांना मुंबईतच थांबण्याचे आदेश वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे राज्यसभेचे उमेदवार पीयूष गोयल यांचे जिनेव्हातील कार्यक्रम रद्द केले आहेत.

नियमानेच मतदान दाखवलं : आव्हाड
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मी मतदान केलं. त्यानंतर माझ्या पक्षांचे एजंट होते त्यांना मतदान दाखवायचं असतं. कागद माझ्या छातीवर होता, कॅमेरा माझ्या मागे होता. मतपत्रिका बंद करून आलो, मतदान केलं आणि गेटवर आलो. माझं मतदान ज्या व्यक्तीला दाखवायचं असतं, नियमाने त्यांना मतदान दाखवलं.”

बातम्या आणखी आहेत...