आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:ट्रॅव्हल एजंटशी मैत्री करणे पडले महागात; छायाचित्र व्हायरल करून मोडले लग्न; ग्रामीण सायबर पोलिसांकडून आरोपीला हनुमाननगरातून अटक

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रॅव्हल्सचे काम करणाऱ्या एजंट राहुल राजू रॉय (२२) याने पुणे-औरंगाबाद प्रवासादरम्यान मुलीसमोर स्वत:ची छबी तयार करून मैत्री केली. त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. परंतु, तिने नकार दिला म्हणून त्याने फेसबुकवर तिच्या नावे प्रोफाइल तयार करून सोबतचे छायाचित्र अपलोड केले. त्यामुळे तरुणीचे लग्न मोडले. त्याने गेल्या दोन महिन्यांपासून तिच्या बदनामीचा प्रकार सुरू केला होता. याप्रकरणी तिने जिल्हा सायबर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी हनुमाननगरातून त्याला बुधवारी अटक केली.

मूळ पुसद (जि. यवतमाळ) येथील रहिवासी राहुल शहरात खासगी ट्रॅव्हल्सवर काम करत गारखेड्यातील हनुमाननगरात भाड्याने राहत होता. तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद ग्रामीणमधील २० वर्षीय राणी (नाव बदललेले आहे) दोन ते तीन वेळेस एकाच ट्रॅव्हल्सने पुण्याला गेली. यादरम्यान राहुलने तिकीट काढून देण्याच्या बहाण्याने मोबाइल क्रमांकांची देवाणघेवाण करून मैत्री केली. त्यानंतर पुणे-औरंगाबाद प्रवासादरम्यान त्याने तिच्यासोबत काही फोटो काढले. या वेळी तिने त्याला मैत्री असल्याचे स्पष्ट केले होते. पण, कालांतराने तिने लग्नासाठी स्थळ पाहणे सुरू केल्याचे सांगताच त्याने तिला लग्न न करण्याचा हट्ट सुरू केला.

मात्र, तिने स्पष्ट नकार दिला. याचा राग आल्याने राहुलने तिच्या नावाने फेसबुकवर खोटे प्रोफाइल तयार केले. त्यावर तिचे छायाचित्र व्हायरल केले. हा प्रकार तिला कळल्यानंतर धक्काच बसला. सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक घुगे, जमादार कैलास कामठे, संदीप वरपे, रवींद्र लोखंडे, नितीन जाधव, योगेश मोईम, सविता जायभाये, लखन पाचोळे, योगेश दारवंटे, गजानन बनसोड, मुकेश वाघ, रूपाली ढोले यांनी दहा दिवस तपास केला. तेव्हा हनुमाननगरातील राहुल हा प्रकार करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला अटक केली.

बातम्या आणखी आहेत...