आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 नोव्हेंबरला मतदान:पदवीधर अधिसभा उमेदवारांचे बीड, औरंगाबाद असेल विजयासाठी टार्गेट

औरंगाबाद / डॉ. शेखर मगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवीधर अधिसभेच्या १० जागांसाठी २६ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ४ जिल्ह्यांतील ३६,८८२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. विशेष म्हणजे, राजकीयदृष्ट्या ‘हॉट डेस्टिनेशन’ असलेल्या औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात एकूण मतदारांच्या तुलनेत ८२.४४ टक्के मतदार आहेत. जालना, उस्मानाबादच्या यादीत फक्त १७.५६ टक्के मतदार आहेत. विजयश्री खेचण्याच्या इराद्याने निवडणूक आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांना ५१ पैकी बीड, औरंगाबादच्या २८ मतदान केंद्रांवरच लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

पदवीधर अधिसभेसाठी ४ नोव्हेंबरला नामांकन दाखल करण्याची अखेरची मुदत संपली. त्यानंतर ५ नोव्हेंबरला छाननी करून ७ नोव्हेंबरला वैध-अवैध उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. १२६ पैकी ९ अर्ज अवैध ठरले. ९० अर्ज वैध झाले असून २७ जणांनी दोन अर्ज केल्याचे निष्पन्न झाले आहे. खुल्या प्रवर्गातील ४८ पैकी ४ जणांचे अर्ज अवैध झाले आहेत. ७ पैकी २ महिलांचे नामांकन अवैध झाले असून उत्कर्ष पॅनलच्या मीनाक्षी शिंदे यांचेही त्यात नाव आहे. अनुसूचित जमातीचे ७, अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीयांतून प्रत्येकी ९ अर्ज वैध ठरले आहेत. तर भटक्या विमुक्त मतदारसंघातून १९ पैकी ३ अवैध झाले आहेत. आता ११ नोव्हेंबरला सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ पर्यंत नामांकन मागे घेण्याची मुदत आहे. त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. त्या वेळी चित्र अधिक स्पष्ट होईल.

पण या वे‌ळी उमेदवार औरंगाबाद आणि बीड या दोनच जिल्ह्यांतील मतदारांवर फोकस करण्याची शक्यता आहे. कारण, औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मतदान केद्रांवर सर्वाधिक १७,७६५ मतदार आपला हक्क बजावतील. एकूण मतदानाच्या तुलनेत हे प्रमाण ४८.१६ टक्के आहे. म्हणजेच यादीतील निम्मे मतदार औरंगाबादेतील नऊ तालुके आणि शहरातच आहेत. त्याखालोखाल बीड जिल्ह्यातील १२ केंद्रांवर १२,५९३ मतदान असून त्याचे प्रमाण ३४.१४ आहे. दोन्ही जिल्ह्यांचे मतदार ८२.४४ टक्के आहे. जालना जिल्ह्यातील ९ केंद्रांवर १०.८२ टक्के म्हणजेच ३,९९३ मतदार आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या १० मतदान केंद्रांवर २, ५३१ मतदार आहेत. त्याचे प्रमाण निव्वळ ६.८६ टक्के आहे. एका बूथसाठी ६ कर्मचारी तैनात, २८ नोव्हेंबरला मतमोजणी ५१ मतदान केंद्रांवर ८५ बूथ आहेत. प्रत्येक बूथवर १ केंद्रप्रमुख, १ अधिकारी, दोन इतर अधिकारी, शाई लावण्यासाठी १ कर्मचारी, १ शिपाई असे एकूण ६ कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. मतमोजणीवेळी मतपत्रिकांची अदलाबदल होऊ नये, म्हणून ६ कलरच्या वेगवेगळ्या ६ मतपत्रिकांची छपाई केली जाणार आहे. या कलरफुल मतपत्रिकेमुळे मतमोजणी सुरळीत होईल, अशी विद्यापीठ प्रशासनाला आशा आहे. मतपेट्यांची वाहतूक करण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली आहे. २८ नोव्हेंबरला विद्यापीठात मतमोजणी केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...