आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:बीडला मिळणार कृष्णेचे पाणी; पर्यावरण खात्याची योजना क्र. 3 ला मंजुरी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक 3 च्या अडचणी दूर, 5.68 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा

कृष्णा-मराठवाडा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील कामांना केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल खात्याची नुकतीच मंजुरी मिळाली आहे. यामुळे कृष्णा खोऱ्याचे ५.६८ टीएमसी पाणी बीड जिल्ह्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील २७,५४३ हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ४,८४५ कोटींच्या कृष्णा-मराठवाडा योजनेस राज्य सरकारने २७ ऑगस्ट २००९ रोजी मान्यता दिली होती. याअंतर्गत मराठवाड्याच्या वाट्याच्या २७ पैकी २३ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाद्वारे उजनी जलाशयातील २१ टीएमसी आणि सिना काेळेगाव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातून २.६६ टीएमसी पाणी मिळणार आहे.

योजना क्र. ३ ला मंजुरी : प्रकल्पाचा एक भाग असणाऱ्या आष्टी उपसा सिंचन योजना क्र. ३ साठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने नुकतीच मान्यता दिली आहे. यामुळे आष्टी उपसा सिंचन योजना, साठवण तलाव, पाइपलाइन, पोच कालव्यांची कामे करण्याच्या कामातील अडथळे दूर झाले आहेत. आष्टी उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी १,६७३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पैकी १५० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. सद्य:स्थितीत या योजनेतील खुंटेफळ साठवण तलावाचे काम ४५ % पूर्ण झाले आहे. पंपगृह, पाइपलाइन आणि पोच कालव्यांच्या कामांच्या अंदाजपत्रकांना मंजुरी देण्यात आली असून सर्वेक्षण व अन्वेषणाची कामे प्रगतिपथावर आहेत.

२०२४ पर्यंत संपूर्ण योजना पूर्ण होईल

योजनेच्या पहिल्या दोन टप्प्यांतील कामे जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून तिसऱ्या टप्प्यासह संपूर्ण योजना २०२४ पर्यंत पूर्ण होईल. यामुळे बीड जिल्ह्यातील २७, ५४३ हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. - एन. व्ही. शिंदे, कार्यकारी संचालक, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ

0