आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दहा महिन्यांतच मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांंमध्ये मद्यविक्रीने उच्चांकी पातळी ओलांडली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत बिअरच्या विक्रीत तब्बल ८०.६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात एकट्या परभणी जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत ६ लाख लिटरने बिअर विक्री वाढली असून हे प्रमाण १२३.२१ टक्के आहे. त्याखालोखाल हिंगोली जिल्ह्यात बिअर विक्रीचे प्रमाण १०४ टक्क्यांनी वाढले असून औरंगाबादमध्ये १० महिन्यांत ४० लाख लिटर बिअरची विक्री झाली.
२०१९ ते २०२१ या कोरोनाकाळात मद्य निर्मिती व विक्री या दोन्हीवर मोठा परिणाम झाला होता. यंदाच्या वर्षात मात्र त्यात मोठा बदल दिसून येत आहे. यंदाच्या एप्रिलपासून अवघ्या ८ महिन्यांत मद्यविक्रीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीतून पुढे आले आहे. विशेष म्हणजे अन्य मद्यांच्या तुलनेत बिअरच्या विक्रीत मोठी वाढ झाली असून परभणी व हिंगोली हे जिल्हे त्यात अग्रेसर आहेत.
हिंगोलीत वाइनला पसंती, दुसऱ्या क्रमांकावर बीड
हिंगोली जिल्ह्यात गेल्या वर्षी ४ हजार लिटर वाइनची विक्री झाली होती. यंदा हे प्रमाण ९ हजार ७४ लिटरच्या पुढे गेले आहे. ही वाढ ११७.७१ टक्के दिसते आहे. त्याखालोखाल बीडमध्येही वाइन विक्रीचा आलेख २१ हजार १७२ लिटरने वाढल्याने १०१.५९ टक्क्यांची वाढ दिसते आहे.
परवान्यांसाठी मागणी वाढली
मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मद्यविक्रीमध्ये वाढ झाली आहे. यात बिअरचे वाढते प्रमाण मद्यपींमधील बदलता ट्रेंड दाखवणारे आहे. परवान्यांची मागणीही वाढते आहे. यात तरुणांची संख्या अधिक आहे. गावठी दारूवर सातत्याने होत असलेल्या कारवाई, छापेमारीमुळेही वैध विक्रीवर चांगला परिणाम झाला आहे.- प्रदीप पवार, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.